

Kaij Gambling Den Raid
केज : केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ढाकेफळ येथे सुरू असलेल्या तीर्रट जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी महिंद्रा थार, आयफोन, मोबाईल, रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण २५ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सहा जुगाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक जण पोलिसांच्या हाती लागला नाही.
युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांना ढाकेफळ येथे किशोर जाधव यांच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या शेजारी अवैधरीत्या तीर्रट जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक मांजरमे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने १९ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईत अमोल मनोहर थोरात, सागर गुलाब थोरात, दिनेश राजेभाऊ थोरात, महेश सुभाष थोरात, सुनील श्रीधर थोरात आणि विष्णू रामकिशन थोरात (सर्व रा. ढाकेफळ, ता. केज) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर भरत विश्वंबर थोरात हा पोलिसांची चाहूल लागताच पसार झाला.
पंचांसमक्ष झडती घेतली असता पोलिसांना २१ हजार ५०० रुपये रोख, एक आयफोन, मोबाईल फोन, महिंद्रा थार वाहन तसेच जुगाराचे साहित्य आढळून आले. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सादेक आत्तार यांच्या तक्रारीवरून अमोल मनोहर थोरात, सागर गुलाब थोरात, दिनेश राजेभाऊ थोरात, महेश सुभाष थोरात, सुनील श्रीधर थोरात, विष्णू रामकिशन थोरात आणि पसार झालेला भरत विश्वंबर थोरात (सर्व रा. ढाकेफळ) यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक २५८/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल केशव खाडे करीत आहेत.
या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्यासह पोलिस हेडकॉन्स्टेबल केशव खाडे, पोलिस कॉन्स्टेबल कोकाटे, पठाण, गृहरक्षक दलाचे जवान खरबड, वैरागे, बोराडे, बोरगावकर आणि पंचांनी सहभाग घेतला.
केज : सहाय्यक पोलीस महेश क्षीरसागर यांनी साळेगाव येथे सुरू असलेल्या पाच मटका बुक्कीवर धाड टाकून मुद्देमालासह एकाला ताब्यात घेतले.
दि. २० सप्टेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, साळेगाव (ता. केज) येथे गांजी पाटीवर हॉटेलच्या शेजारी मटका सुरू असून काही लोक मटक्यावर स्वतःच्या फायद्यासाठी मटक्याचे आकडे घेऊन मटका खेळत व खेळवीत आहेत, अशी खात्रीलायक माहिती मिळाल्या वरून सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर आणि जमादार पुरुषोत्तम शेप यांनी धाड टाकली आणि गोविंद आकुसकर यांना ताब्यात घेऊन त्याच्या कडून रोख रकमेसह ९ हजार रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला.
या प्रकरणी गोविंद आकुसकर याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.