

Beed Umri Phata Toll Booth Crime
केज : वाहनावर फास्टॅग लावण्यास सांगितल्याच्या कारणावरून टोल कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून खुर्चीने मारहाण केल्याची घटना केज-मांजरसुंबा मार्गावरील उमरी फाटा टोल नाक्यावर घडली. याप्रकरणी टोल कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून एका व्यक्तीविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधिताने टोल नाका जाळून टाकण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
ही घटना ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. तक्रारीनुसार, सुग्रीव कराड हे इनोव्हा क्रिस्टा वाहनातून उमरी टोल प्लाझावर आले होते. त्यावेळी टोल नाक्यावर कामावर असलेले २० वर्षीय कर्मचारी सुयश देशमुख यांनी त्यांच्या वाहनावर फास्टॅग लावण्यास सांगितले.
यावरून सुग्रीव कराड यांनी देशमुख यांना ‘तू कुठला आहेस?’ अशी विचारणा केली. देशमुख यांनी आपण मस्साजोग येथील रहिवासी असल्याचे सांगितल्यानंतर कराड यांनी वाहनातून खाली उतरून त्यांना शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
त्यानंतर कराड यांनी खुर्चीने देशमुख यांच्या पोटावर, मांड्यांवर आणि उजव्या हातावर मारहाण करून दुखापत केल्याचा आरोप आहे. यावेळी त्यांनी टोल नाका जाळून टाकण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेप्रकरणी सुयश देशमुख यांच्या तक्रारीवरून सुग्रीव कराड यांच्याविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५०८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५(२), ११८(१), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद चव्हाण पुढील तपास करीत आहेत.