

Film Producer Sentenced Check Bounce Case
केज : चित्रपट निर्मितीसाठी उसने घेतलेल्या रकमेचा चेक अनादरित झाल्याप्रकरणी न्यायालयाने तब्बल तेरा वर्षांनंतर एका चित्रपट निर्मात्याला तीन महिन्यांच्या कारावासासह तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील घुगी येथील रहिवासी तथा सध्या लातूर येथे वास्तव्य करणारे चित्रपट निर्माता व्यंकट अर्जुन रोंगे यांनी डिसेंबर २०११ मध्ये अंबाजोगाई येथील विधीज्ञ राम दशरथ थोरात यांच्याकडून, त्यांचे मित्र डॉ. मकबूल पठाण यांच्या मध्यस्थीने, चित्रपट निर्मितीसाठी एक लाख रुपये उसने घेतले होते. एका वर्षानंतर दोन लाख रुपये परत देण्याचे दोघांत ठरले होते.
त्याअनुषंगाने रोंगे यांनी IDBI Bank च्या खात्यावरील १० जानेवारी २०१३ दिनांकाचा दोन लाख रुपयांचा धनादेश थोरात यांना दिला. रोंगे यांच्या विनंतीनुसार हा चेक एक महिन्यानंतर बँकेत जमा करण्यात आला. मात्र १३ फेब्रुवारी २०१३ रोजी खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने धनादेश अनादरित झाला.
याबाबत कळविल्यानंतर रोंगे यांनी पुन्हा एकदा चेक जमा करण्यास सांगितले. त्यानुसार एप्रिल २०१३ मध्ये धनादेश पुन्हा सादर करण्यात आला; परंतु १० एप्रिल २०१३ रोजी तो पुन्हा ‘अपुरी शिल्लक’ या कारणावरून परत आला. त्यानंतर थोरात यांनी २२ एप्रिल २०१३ रोजी नोंदणीकृत टपालाद्वारे कायदेशीर नोटीस पाठवली. संबंधित नोटीस लातूर येथील पत्त्यावर पोहोचल्याची नोंद असली तरी त्यानंतरही देयकाची पूर्तता करण्यात आली नाही.
यामुळे थोरात यांनी १५ जून २०१३ रोजी ॲड. गणेश स्वामी यांच्या मार्फत अंबाजोगाई येथील न्यायालयात धनादेश अनादरप्रकरणी दावा दाखल केला. या प्रकरणात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि सादर पुरावे विचारात घेऊन अतिरिक्त मुख्य न्यायाधीश भानुप्रताप बी. चौहान यांनी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी निकाल देताना आरोपी व्यंकट रोंगे यांना तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची तसेच तीन लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
चित्रपट निर्मितीसाठी घेतलेले एक लाख रुपये आणि त्यावरील परतफेडीचा वाद अखेर न्यायालयापर्यंत पोहोचला. पैसे घेणारा चित्रपट निर्माता आणि पैसे देणारा व्यवसायाने वकील अशी या प्रकरणाची पार्श्वभूमी आहे. धनादेश अनादरित झाल्याने चित्रपट तयार होण्यापूर्वीच निर्मात्याच्या आयुष्याची वेगळीच ‘चित्तरकथा’ न्यायालयीन प्रक्रियेतून समोर आली आहे.