

टाकरवण : गेवराई तालुक्यातील सुर्डी बुद्रुक शिवारात मेढ्या चरण्यास विरोध केल्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात मेढ्या चरण्यास न दिल्याने रागातून ३० ते ४० जणांच्या जमावाने पारधी वस्तीवर सशस्त्र हल्ला चढवला. या हल्ल्यात तीन महिला गंभीर जखमी झाल्या असून वस्तीवरील मालमत्तेचे मोठे नुकसान करण्यात आले आहे.
या हल्ल्यात पायल डिस्टीमन काळे, शेवंता डिस्टीमन काळे आणि राघबाई मेघवर काळे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण वस्तीवर सध्या भीतीचे सावट पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांनी सखाराम टेहळे, अशोक कोळेकर, महादु तुरे, बळीराम तुरे, लाहणु चिलगर यांच्यासह २५ हून अधिक जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.