Beed district prison facilities : फोनवरून संवाद; दहा हजारांची कॅन्टिन!

कारागृहातील कैद्यांनाही असतात सुविधा; परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी 208 सीसीटीव्ही
Beed district prison facilities
Beed district prisonpudhari photo
Published on
Updated on

बीड ः बीड जिल्हा कारागृहातून वेगवेगळ्या कैद्यांच्या ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहेत. यावरून तर्क-वितर्क लावले जात असले तरी प्रत्येक कैद्याला प्रत्येक आठवड्याला दहा मिनिटे या प्रमाणे महिन्यातून चाळीस मिनिटे ऑडिओ व किमान वीस मिनिटी व्हीसीद्वारे कुटुंबीयांशी संवाद साधता येतो. याबरेाबरच कारागृहाच्या कॅन्टिनमधून त्याला हवा असलेला खाद्यपदार्थ तो खरेदी करू शकतो, या सुविधा सर्वच कैद्यांना मिळतात, असे असले तरी कोणाकडूनही नियमाचा भंग होणार नाही, याकरिता प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असून या कारागृह परिसरात तब्बल 208 सीसीटीव्ही कार्यान्वित असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

बीड जिल्हा कारागृह गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. कधी कैद्यांमधील दोन गटांतील मारामारी असेल, कधी कैद्यांना व्हीआयपी सुविधा मिळत असल्याचा आरोप असेल अथवा आता गेल्या तीन दिवसांपासून व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिप्स असतील, या सर्वांमुळे सर्वसामान्यांमध्ये शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. अगदी कारागृहात कैद्याकडे फोन आलाच कसा? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात होता.

Beed district prison facilities
Smuggling case JNPT : जेएनपीएमध्ये टरबूज बी,चिनी फटाके जप्त

याबरेाबरच कैद्यांना हवे ते पदार्थ कसे काय मिळतात? कैद्याला तपासणीसाठी जेलबाहेर कसे काय आणले जाते? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात असल्याने बीडचे कारागृह अधिक्षक रामराजे चांदणे यांना संपर्क साधला असता त्यांनी कैद्यांना कायद्यानुसार मिळणाऱ्या सुविधा, कारागृह प्रशासनाची जबाबदारी याविषयी माहिती दिली. बीडच्या कारागृहाची क्षमता ही 144 कैद्यांची असतांना तब्बल 374 कैद्यांना या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. हे सर्व कैदी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याने त्यांच्यामध्ये अनेकदा वाद होतात, त्या सर्वाबाबतचे अहवाल वरिष्ठांकडे पाठवले जातात.

कारागृहात जे कैदी आहेत, त्यांच्या कुटुंबीयांचे तीन मोबाईल क्रमांक प्रारंभीच घेतलेले असतात. कारागृह प्रशासनाकडून ते तीन नंबर ॲड असलेले एक कार्ड त्याला दिले जाते, त्याच्या बरॅक समोरच असलेल्या मशीनमध्ये कार्ड टाकून त्याला कुटुंबीयांना संवाद साधता येतो. याबरोबरच कुटुंबीयांपैकी कोणीही थेट भेटीला आले नाही तर आठवड्यातून एक वेळेस वीस मिनिटे व्हीसीद्वारे संवादही साधता येतो. ही सुविधा कारागृहातील सर्व कैद्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.याबरोबरच प्रत्येक कैदी कारागृहाच्या कॅन्टिनमधून त्याला हवे असलेले पदार्थ मागवू शकतो, यामध्ये जवळपास साडेतीनशे पदार्थ व वस्तुंचा समावेश असून यासाठी त्याला महिन्याला दहा हजार रुपये खर्च करण्याची परवानगी आहे.

Beed district prison facilities
Nashik GST Bribery Case | नाशिक जीएसटी कार्यालयात सव्वा कोटींची लाच! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह खासगी व्यक्तीला पोलीस कोठडी

यामध्ये तो अगदी व्हेज, नॉनव्हेज, ड्रायफ्रुटस्‌‍, बेकरी पदार्थ अथवा इतर सुचिमध्ये समाविष्ट कोणतेही पदार्थ मागवू शकतो. या सर्व सुविधा असल्या तरी कारागृहाच्या नियमांचे पालन काटेकोरपणे व्हावे याची दक्षताही घेतली जाते, यासाठी नियमावली तर आहेच याबरोबरच परिसरात तब्बल 208 सीसीटीव्ही कॅमेरे परिसरात असून प्रत्येक मिनिटाचे रेकॉर्डिंग या ठिकाणी होते. या सर्व रेकॉर्डची तपासणी देखील वरिष्ठ कार्यालयाकडून सातत्याने होत असल्याची माहिती चांदणे यांनी दिली.

अंबाजोगाईतील कारागृहाचे काम प्रगतिपथावर

बीड कारागृहात कैद्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे यामुळे अंबाजोगाई येथे कारागृह उभारणीचा प्रस्ताव यापूर्वी सादर करण्यात आला होता. आता या कारागृहात साठीची जमीन कारागृह विभागाकडे वर्ग करण्यात आली असून सध्या प्राथमिक पातळीवरचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. हे कारागृह उभारले गेल्यानंतर बीड कारागृहावरील अतिरिक्त भार कमी होऊ शकणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

आता कारागृहातच दवाखाना, क्षमता वाढणार

कारागृहात बंदी असलेल्या कैद्यांना अनेकदा उपचाराची गरज लागते, त्यासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले जाते. ही सर्व कसरत टळावी यासाठी आता कारागृहातच दहा बेडचे रुग्णालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. याशिवाय आहे त्या कारागृहात अधिक क्षमतेने कैदी ठेवता यावेत याकरिता शंभर कैद्यांच्या क्षमतेचे चार बरॅक उभारण्याचे प्रस्ताव देखील देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news