

Beed Mother and son death
गेवराई: आई-मुलाचे नाते किती जिव्हाळ्याचे आणि अतूट असते, याचा हृदयद्रावक प्रत्यय इंदेगाव येथे आला आहे. मुलाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने अवघ्या सात दिवसांत वृद्ध आईनेही अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. या घटनेने भवार कुटुंबावर दु:खाचा मोठा आघात झाला आहे. पैठण तालुक्यातील इंदेगावात येथील हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
इंदेगाव येथील बप्पासाहेब आसाराम भवार (वय 60) यांचे शुक्रवारी (दि. 20) अल्पशा आजाराने रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. कुटुंबातील कर्ता पुरुष असलेल्या बप्पासाहेबांच्या निधनाने घरात शोककळा पसरली होती. त्यांच्या जाण्याचा पत्नी इंदुबाई, मुलगा दीपक, सुशील, प्रविण, मुलगी शिवकन्या ऊर्फ मनिषा यांच्यासह सर्वात मोठा धक्का बसला तो त्यांची 95 वर्षीय आई शांताबाई आसाराम भवार यांना.
मुलाच्या निधनानंतर त्या पूर्णपणे खचून गेल्या होत्या. मुलाच्या आठवणीत त्या सतत व्याकूळ होत होत्या. माझा मुलगा मला सोडून गेला, ही भावना त्यांना सहन होत नव्हती. मुलाच्या मृत्यूनंतर त्यांच्या तब्येतीत झपाट्याने खालावत गेली. अन् अखेर गुरुवारी त्यांनीही जगाचा निरोप घेतला. मुलाच्या विरहात आईनेही प्राण सोडल्याने आई-मुलाचे अतूट नाते मृत्यूनंतरही कायम राहिल्याची भावना नातेवाईक तसेच गावकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
आई-मुलाचे नाते किती पवित्र आणि भावनिक असते, याचा प्रत्यय या घटनेतून येतो. मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही विरह सहन न झाल्याने देह ठेवला, हे ऐकून गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. दरम्यान भवार कुटुंबावर सात दिवसांत दुहेरी आघात झाल्याने कुटुंब सध्या दु:ख सागरात बुडाले आहे. एकीकडे कुटुंबातील आधारस्तंभ असलेला मुलगा आणि दुसरीकडे घरातील वयोवृद्ध आई या दोघांच्याही निधनामुळे कुटुंब शोकमग्न झाले आहे.
बप्पासाहेब भवार यांचे निधन 20 मार्च रोजी झाले होते. त्यानुसार त्यांचा दशक्रिया विधी 29 मार्च रोजी गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन शनीचे येथे होणार होता. दरम्यान त्यांच्या आई शांताबाई भवार यांचेही निधन झाल्याने आता 29 मार्च रोजी आई आणि मुलगा या दोघांचाही दशक्रिया विधी एकाच दिवशी करण्यात येणार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आई-मुलाच्या अतूट नात्याची ही भावनिक घटना सर्वांना हेलावून टाकणारी ठरत आहे.