

Beed District Hospital Issues
बीड : सन २०१६-१७ मध्ये जिल्हा रुग्णालयाच्या आवारात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तब्बल २१ कोटी रुपये खर्चून उभारलेले माता व बाल रुग्णालय आजही निधीअभावी सुरू न होता धुळखात पडले आहे. कंत्राटदार व बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे २०२३ पर्यंत बांधकाम पूर्ण व्हायलाच उशीर झाला. आता गेल्या अडीच वर्षांपासून लिफ्ट, फायर फायटिंग, विद्युतीकरण व फर्निचरच्या कामांसाठी निधी न मिळाल्याने ही इमारत वाऱ्यावर पडली आहे. दरम्यान, याच्या निषेधार्थ रूग्णालय परिसरात लक्ष्यवेधी शेकोटी आंदोलन करण्यात आले.
या दुर्लक्षाविरोधात सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीकडून ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यातून फायर फायटिंग व विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. तथापि, फर्निचर आणि लिफ्ट स्थापनेसाठी अद्याप निधी मिळालेला नाही. परिणामी ही १०० खाटांची आधुनिक इमारत आजही वापरात येऊ शकलेली नाही.
डॉ. गणेश ढवळे म्हणाले की, जिल्हा रुग्णालयात सध्या ३२० खाटांची क्षमता असून ४५० हून अधिक रुग्ण उपचार घेत असतात. प्रसूती व सिझेरियन प्रकरणांमध्ये बीड जिल्हा राज्यात अग्रस्थानी आहे. परंतु जागेअभावी अनेक गर्भवती महिलांना खाट मिळत नाही, ही प्रशासनाची लाजिरवाणी बाब आहे.
त्यामुळे फर्निचर व लिफ्टसाठी तातडीने निधी मंजूर करावा या मागणीसाठी दि.१० नोव्हेंबर (सोमवार) रोजी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात “अजितदादा के नाम पे दे दे बाबा” भिक मांगो लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा डॉ. ढवळे यांनी दिला आहे. या संदर्भात त्यांनी पालकमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर व जिल्हा प्रशासनाला निवेदनही दिले आहे.