

Beed heavy rain agriculture loss
अविनाश मुजमुले
वडवणी, पुढारी वृत्तसेवा वडवणी तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून वडवणी तालुका पूर्ण पाण्याखाली गेला आहे. तालुक्यातील अनेक गावांचा वडवणी शहरापासून संपर्क तुटला आहे. सर्वत्र पुर परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. तर दुसरीकडे शेतातच कापसाच्या वाती झाल्या असून सोयाबीनची अक्षरशः माती झाल्याने बळीराजा संकटात आहे.
बीड जिल्हा रेड अलर्ट मोडवर असुन रात्रीपासून वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटसह वडवणी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने तालुक्यातील नदी, नाले, तलाव ओव्हर फ्लो झाले असून दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्यातील अनेक गावांचा वडवणी शहाराशी संपर्क तुटला होता तर त्यामुळे दळणवळणचा प्रश्न निर्माण झाला होता. तालुक्यात जास्त पाऊस झाल्याने पिके पाण्याखाली गेले आहेत.
वडवणी तालुक्यातील अतिवृष्टीने कापसाच्या झाल्या वाती तर सोयाबीनची झाली माती असेच म्हणावे लागेल कारण या अतिवृष्टीत कांदा, कापूस, सोयाबीन, तुर, आदि पिके पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उभ्या पिकांना पावसाचा तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे असंख्य शेतातील माती खरडून गेली. पावसाच्या पाण्याने पिके वाहून गेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
पावसाचा कहर इतका जबरदस्त होता की, सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. नद्या, नाले, तलाव, ओढे, पाण्याने तुडूंब भरून वाहीले. या पाण्यामुळे फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे.
मोसंबी, डाळिंब, यासह आदी फळबागेत पाणी तुंबल्याने या फळबांगाची मोठी हानी होणार आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी विवंचनेत सापडला आहे. या पावसामुळे सर्व शेतशिवार जलमय झाले. शेतांना तलावाचे तर पिकांतुन वाहणाऱ्या पाणी पाहून 'त्या' पाण्यास ओढ्याचे स्वरुप आल्याचे पाहावयास मिळाले आहे. सरकारने वडवणी तालुका ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी शेतकरी बांधवातुन केली जात आहे.
वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा येथील अप्पर कुंडलिका प्रकल्पाचे दोन दरवाजे १. मी उघडले असून नदीपात्रात पाणी विसर्ग करण्यात येत आहे. पाऊस सुरूच असून धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असून आणखी दरवाजे उघडले जाणार आहे. तरी नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये असे आव्हान पाट बंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.