

बीड ः बीड जिल्ह्यात आगामी तीस दिवस पुरेल एवढा गॅस साठा आहे. याबरोबरच पेट्रोल आणि डिझेलचाही साठा पुढील दहा दिवस पुरेल एवढा असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. याबाबतचा आढावा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत शुक्रवार, 13 मार्च रोजी घेतला.
आखाती युध्द परिस्थिती लक्षात घेता इंधनाबाबत तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये तुटवड्याचे कारण सांगून ग्राहकाकडून अतिरिक्त पैसे घेणे, टंचाईच्या भीतीमुळे गॅसचा साठा करून ठेवणे, घरगुती गॅसचा वापर वाणिज्यीक कारणासाठी करणे, गाहकांच्या मागणीनंतर पुरवठा उशिरा करणे अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.
याबाबत आज दिनांक. 13 मार्च रोजी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा पुरवठा अधिकारी शिवकुमार स्वामी, यांच्या उपस्थितीत सहा. जिल्हा. पुरवठा अधिकारी वसुधा रघाताटे, निरीक्षण अधिकारी प्रशांत सुपेकर, महसूल अधिकारी प्रकाश तांबड, कीर्तीमाला कुलकर्णी, चंद्रजीत सिंग, ब्रिजेश कुमार, अमित बोरसे, नीलेश नरखडे, मनोज कुमार, सारडा व पेट्रोल, डिझेल, गॅस वितरक यांची सविस्तर आढावा बैठक घेतली व पुरवठा सुरक्षितपणे चालू ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले.
बीड जिल्ह्यात कार्यरत असलेल्या कंपनी मार्फत घरगुती एलपीजी गॅस व वाणिज्य वापरासाठी गॅस तसेच पेट्रोल व डिझेलचा पुरवठा करण्यात येतो. सद्यस्थितीमध्ये बीड जिल्ह्यात सुमारे 30 दिवस पुरेल एवढा साठा शिल्लक असून कुठल्याही प्रकारची तुटवड्याची परिस्थिती नाही. वाणिज्य वापरासाठीचा गॅस सद्यस्थितीमध्ये फक्त हॉस्पिटल व शाळेकरिता उपलब्ध आहे. पेट्रोल व डिझेलचा साठाही 10 दिवसांपेक्षा जास्त दिवस पुरेल एवढा शिल्लक आहे.
तसेच त्यांचे डेपोमध्ये 30 दिवस पुरेल एवढा साठा शिल्लक असून कुठल्याही परिस्थितीमध्ये तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाही. तसेच घरगुती गॅसची नोंदणी मागणीची मर्यादा 45 दिवस करण्यात आली आहे.पेट्रोल, डिझेल व गॅसच्या सुरळीत वितरणासाठी तसेच अवैध वापर रोखण्यासाठी पथके गठित करण्यात आली आहेत. या पथकांनी गॅस एजन्सींना वेळोवेळी भेटी द्याव्यात, ग्राहकांशी संपर्क साधावा तसेच काही अडचण आल्यास जिल्हा नियंत्रण कक्षास अवगत करावे असे निर्देश देण्यात आले आहेत.
बीड जिल्हयामध्ये पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचा पुरेसा साठा असून पुरवठा सुरळीत चालू आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवून अनावश्यक साठा करू नये व गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी टाळावी. जिल्हा प्रशासन, तसेच ऑईल कंपन्या, जिल्ह्यातील गॅस सिलिंडरचा साठा, पेट्रोल व डिझेल साठा सुरळीत व कायम ठेवणेबाबत कटिबध्द आहे, असे आवाहन विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी बीड यांनी केले आहे.