

केज : गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या दोघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
या बाबतची माहिती अशी की, सोमवारी (दि. ६) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार जफर पठाण यांना गुप्त बातमी मिळाली होती की, केज तालुक्यातील लव्हुरी येथील सोमनाथ राजाभाऊ चाळक यांच्याकडे एक गावठी कट्टा असून तो लव्हुरी येथे जिल्हा परिषद शाळे जवळ थांबला आहे. ही माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांना दिली. त्या संदर्भात पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस हवालदार जफर पठाण यांना दिले.
जफर पठाण यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पथकातील सहकाऱ्यांना घेऊन लव्हुरी येथे सापळा लावला. सोमनाथ याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे ताब्यात घेतले होते.
आरोपी सोमनाथ चाळक याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे हे केज तालुक्यातील सावंतवाडी येथील विकास सुभाष सावंत याच्या कडून विकत घेतल्याचे सांगितले. त्यानंतर सावंत ताब्यात घेतले होते. केज पोलीस ठाण्यात सोमनाथ चाळक आणि विकास सावंत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आज (दि. ७) जानेवारी २०२५ रोजी त्यांना न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.