

बीड :बीड तालुक्यातील घोसापुरी गावाच्या शिवारामध्ये शुक्रवारी एका शेडमध्ये सुरू असलेल्या बनावट दारू निर्मितीच्या कारखान्यावर ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. यावेळी वेगवेगळ्या कंपनीच्या बॉटल्स व पॅकिंगचे साहित्य जप्त करण्यात आले.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बीड ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत पोलीस पथकाकडून पेट्रोलिंग सुरू असताना बनावट दारू निर्मिती करणाऱ्या व्यक्तींवर धडक कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक 11 सप्टेंबर रोजी सपोनि बाळराजे दराडे हे पोलीस हवालदार सतीश मुंडे, पोलीस हवालदार अजय सानप, चालक पोलीस शिपाई चव्हाण व होमगार्ड प्रशांत वीर यांच्यासह पेट्रोलिंग करीत असताना छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ एक चारचाकी वाहन संशयास्पदरीत्या अतिशय वेगाने जात असल्याचे निदर्शनास आले.
पोलीस पथकाने सदर वाहनाचा पाठलाग केला असता वाहनचालकाने अतिशय वेगाने वाहन पळविण्याचा प्रयत्न केला. नामलगाव फाट्याजवळ सदर वाहनाची कुत्र्याला धडक झाली. त्यानंतर वाहन घोसापूरी गावाच्या दिशेने वळविण्यात आले.पोलीस पथकाने पाठलाग सुरूच ठेवला असता घोसापूरी गावाच्या अलीकडे सदर चारचाकी वाहन थांबवून त्यातील दोन इसम अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले.
पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता रासायनिक पदार्थांपासून बनावट दारू तयार करण्यासाठी वापरली जाणारी सामग्री, तयार बनावट दारू व इतर साहित्य आढळून आले.तपासादरम्यान सदर व्यक्ती घोसपुरी गावातील असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या घराजवळील पत्र्याच्या शेडची झडती घेतली.
या झडतीमध्ये आरएस कंपनीच्या रिकाम्या बाटल्या, सील पॅक स्टिकर्स तसेच बनावट दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले.या कारवाईत चारचाकी वाहन क्रमांक MH 04 NH 1065, बनावट दारू, दारू निर्मितीचे साहित्य, रिकाम्या बाटल्या, सील आधी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
बीट अंमलदार नेमके काय करत होते?
बीड ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये घोसापूरी शिवारात अशा पद्धतीने अवैधपणे दारू निर्मिती करून तिचा पुरवठा देखील केला जात होता, हे या कारवाई मधून समोर आले आहे. परंतु या भागामध्ये जबाबदारी असलेले बीट अंमलदार यांना मात्र या उद्योगाची कसलीही माहिती कशी काय नव्हती? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून पोलिस ठाण्याच्या प्रमुखांचे देखील या प्रकाराकडे दुर्लक्ष होते की काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दारू पॅकिंग करून पुरवठा कोठे होत होता?
घोसापुरी शिवारामध्ये एका शेडमध्ये सुरू असलेल्या दारू निर्मिती व पॅकिंग करण्याच्या कारखान्यावर पोलिसांनी कारवाई केली परंतु आता या प्रकरणात अधिक तपास करणे गरजेचे आहे. या ठिकाणी घातक रसायनांपासून दारू तयार करून त्यावर स्टिकर लावून ती दारू नेमके कोठे पुरवली जात होती? या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सहभागी आहे ? याचा शोध घेण्याची मागणी होत आहे.