

Dhondrai Gram Panchayat decision
सुभाष मुळे
गेवराई : तालुक्यातील धोंडराई ग्रामपंचायतीने अतिवृष्टीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी व घरकुल लाभार्थ्यांना दिलासा देत घरपट्टी पूर्णपणे माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सरपंच शितल अशोकराव साखरे यांनी ही घोषणा केली असून गावकऱ्यांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे गेवराई तालुक्यासह संपूर्ण बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गोदावरी, सिंधफना आणि अमृता नदीच्या काठावरील शेतजमिनींवर पिके वाहून गेली असून अनेकांच्या घरांनाही फटका बसला आहे. परिणामी शेतकरी, शेतमजूर तसेच ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे डळमळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अमरसिंह पंडित व आमदार विजयसिंह पंडित यांच्या सूचनेवरून धोंडराई ग्रामपंचायतीत चर्चा होऊन सर्वानुमते महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयाने मंजूर केलेल्या ६५० घरकुलांवर प्रत्येकी २००० रुपये इतकी घरपट्टी आकारली होती. मात्र शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाची जाणीव ठेवून ही घरपट्टी परत करण्याचा व थकबाकी वसुलीची कार्यवाही तातडीने थांबवण्याचा ठराव करण्यात आला आहे.
सरपंच शितल साखरे यांनी म्हटले आहे की, “सध्याच्या बिकट परिस्थितीत कर वसुली करणे अन्यायकारक ठरले असते. त्यामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळावा या हेतूने एक वर्षाची घरपट्टी पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. हीच खरी लोकसेवा मानून ग्रामपंचायतीने एकमताने हा निर्णय घेतला आहे.” धोंडराई ग्रामपंचायतीच्या या संवेदनशील व लोकाभिमुख उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये समाधानाची लाट पसरली असून, शेतकरी व घरकुल लाभार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.