

गेवराई : गेवराईतील शिवाई नगरीत अज्ञात चोरट्यांनी तीन घरे फोडून सोन्या- चांदीसह लाखोचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरूवारी (दि.१) मध्यरात्रीनंतर घडली. चोरी झालेली तीनही घरे कुलूप बंद असल्याने याचाच फायदा घेत चोरट्यांनी डल्ला मारला. या घटनेतील दोन चोरटे सीसीटिव्हीत कैद झाले आहेत.
गेवराई शहरात मागील काही दिवसापासून चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. शहरातील शिवाई नगरी येथील बसवंत लांडगे याच्या पत्नीवर बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे ते घराला कुलुप लावून रुग्णालयात पत्नीजवळ थांबले होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील दोन तोळे सोने, चांदीचे दोन कडे अन् एक शिलाई मशीन लंपास केली. यानंतर चोरट्यांनी शिक्षक भगवान राठोड यांच्या घराचे कुलूप तोडून तीन तोळे सोने व रोख रक्कम दीड लाख रूपये लंपास केले. एवढ्यावर न थांबता चोरट्यांनी जवळपास असणाऱ्या धूमक यांच्या बंद घरातदेखील चोरी केली मात्र या घरात चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.