

Vidrupa river flood
सुभाष मुळे
गेवराई : तालुक्यात सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना मोठा पूर आला आहे. विद्रुपासह अमृता नदी दुथडी भरून वाहू लागल्याने गेवराई-शेवगाव राज्य मार्गावरील धोंडराई पुलावरून तब्बल ४ ते ५ फूट पाणी वाहले. सकाळपासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले आहे.
दरम्यान, परिसरातील नागरिक पुलावर मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही अनेक जण पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी पुलावर जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील माटेगाव येथेही मुसळधार पावसाचे मोठे संकट कोसळले आहे. पहाटे दोन वाजल्यापासून झालेल्या जोरदार पावसामुळे गावात पाणी घुसले असून अनेक घरांना पाण्याचा फेरा बसला आहे. शेतकरी व नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. गावाचा संपर्क पूर्णपणे तुटल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.
गेवराई शहरातील विद्रुपा नदी व काठावरील दत्त पार्क पाणीमय झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. तालुक्यातील सध्या अमृता नदीसह परिसरातील ओढे-नाले धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. शेतातील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.