

Beed Find the mastermind behind the death of a female doctor
वडवणी, पुढारी वृत्तसेवा : फलटण (जि. सातारा) येथील उपजिल्हा - रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने केलेली आत्महत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना ठरली आहे. या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील असलेल्या या दिवंगत डॉक्टरच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजलगाव मतदारसंघातील नेते मोहन जगताप शनिवारी त्यांच्या घरी भेट देत सांत्वन करण्यात आले आहे. तसेच थेट मुख्यमंत्री यांना दूरध्वनीवरून संपर्क करत या घटनेमागील मास्टरमाइंडचा शोध घेण्याची मागणी देखील जगताप यांनी केली.
मोहनराव जगताप यांनी या भेटीदरम्यान त्यांनी कुटुंबीयांचे दुःख जाणून घेतले व घटनेतील मृत डॉक्टर मुंडेंना न्याय मिळवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे, कुटुंबीयांच्या समोरच त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्रध्वनीद्वारे संपर्क साधला आणि या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती दिली.
मोहन जगताप यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे या घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून घटनेचा मास्टरमाइंड शोधण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ प्रतिसाद देत, पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील आणि प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध लावला जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले.
या प्रसंगी महादेव जमाले सह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. या घटनेनंतर परिसरात एकच चर्चा सुरू असून, संबंधित महिला डॉक्टरला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सामाजिक स्तरावरून मोठ्या प्रमाणात होत आहे.