

केज :- आवादा कंपनीचे अधिकारी हे पूर्वीच्या सर्वेक्षणानुसार वीजेचे खांब शेतात बसवीत नसून त्यांचे अधिकारी शेतकऱ्यांना दमदाटी करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. या मागाण्यासाठी केज तहसील कार्यालयासमोर शेतकरी आणि महिला आमरण उपोषणाला बसल्या आहेत.
या बाबतची माहिती अशी की, दि. २४ जुलै रोजी केज तहसील कार्यालया समोर केज शेतकरी व महिला आमरण उपोषणाला बसल्या आहेत. त्यांनी निवेदनाद्वारे अशी मागणी केली आहे की, केज शिवारातील सर्वे नंबर ७६ मध्ये त्यांच्या शेत जमिनी आहेत. त्यांच्या जमिनीमध्ये त्यांची पत्र्याची घरे आहेत. त्या जागेत आवादा पवन ऊर्जा कंपनी यांनी पूर्वीच्या सर्वे प्रमाणे विद्युत पोल न बसवता गावगुंडांना हाताशी धरून शेतात जबरदस्तीने पोल उभे करीत आहेत. त्या शेतकऱ्यांना सिद्धेश्वर पाटील, संदीप खेत्रे व अमोल पाटील या तिघांनी त्या शेतकऱ्यांना दमदाटी करून धमकी दिली आहे.
या बाबत शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाला निवेदनाद्वारे कळविले आहे. मात्र आवादा कंपनीचे लोक पुन्हा सर्वे नंबर ७६ मधील शेतकऱ्यांना दमदाटी करून त्रास देत आहेत. तसेच पूर्वीची झालेल्या सर्वे प्रमाणे काम करत नाहीत त्यामुळे शेतात राहत असलेल्या महिला व शेतकरी भयभीत झाले आहेत. हे काम तत्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी केज तहसील कार्यालया समोर रेणूका तेलंग, संगिता तेलंग, साविता भोसले, स्वाती भोसले, कमल वळसे, मीरा थोरात, मेघराज भोसले, सुर्यकांत तेलंग, गोरख थोरात, अशोक भोसले, संतराम भोसले, मारुती भोसले, पांडूरंग भोसले, बलभीम तेलंग हे उपोषणाला बसले आहेत.