

केज :- छत्रपती संभाजीनगर येथून लातूर जिल्ह्यातील मुरूडकडे कांद्याचे बियाणे घेऊन जात असलेल्या टेम्पोतील ५० हजाराचे बियाणे तिघा चोरट्यांनी कोरेगाव जवळ चालत्या वाहनातून पळविले आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. १६ जुलै रोजी सिराज रज्जाक पटेल हा टेम्पो ड्रायव्हरने छत्रपती संभाजी नगर येथील एलोरा नॅचरल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपणीतून एलोरा वंडर (१०१) हे कांद्याचे वाणाचे बियाण्याचे १६० बॉक्स टेम्पो क्र. (एम एच ०४/एफ पी६८८७) मधून घेऊन लातूर जिल्ह्याती ल मुरुडाकडे जात होता. रात्री त्याचा टेम्पो बीडच्या पुढे आल्याने रात्र झाली म्हणून त्यांनी एका पेट्रोल पंपावर वाहन थांबून मुक्काम केला.
त्या नंतर दुसऱ्या दिवशी दि. १७ जुलै रोजी सकाळी मुरुडकडे जात असताना सकाळी ७:०० वाजता टेम्पो मांजरसुंबा-केज रोडवरील कोरेगाव जवळून जात असताना त्यांना एका वाहन चालकाने टेम्पोतील माल चोरटे काढीत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
त्या नंतर टेम्पो ड्रायव्हर सिराज पटेल याने टेम्पो थांबून पाहिले असता तीन अज्ञात चोरटे हे टेम्पोमधून उड्या मारून शेतात पळून जात असताना पाठमोर पाहिले. ड्रायवर सिराज पटेल यांनी मालाची पाहणी केली असता ५९ हजार रु. किंमतीचे बियांचे ५ बॉक्स चोरीला गेले असल्याचे आढळून आले.
त्या नंतर सिराज पटेल यांनी ही माहिती केज पोलीस ठाण्यात दिली असता पोलिस उपनिरीक्षक सय्यद कराडकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सिराज पटेल यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ३८६/२०२५ भा. न्या. सं. ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल सानप हे करीत आहेत.