

गौतम बचुटे
केज : वडिलांच्या नावे असलेले पीक कर्ज कसे फेडायचे ? या विवंचनेतून नैराश्य आलेल्या एका तरुण शेतकऱ्याने राहत्या घरात लोखंडी आडूला साडीने गळफास घेऊन जीवन संपवलेची घटना चिंचोलीमाळी ता. केज येथे गुरुवारी दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी १०:०० वा.च्या सुमारास उघडकीस आली.
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील अजय बापूराव थोरात वय (२९ वर्ष) या तरुण शेतकऱ्याचे वडील बापूराव थोरात यांच्या नावे सुमारे दोन एकर जमीन आहे. वडील वृद्ध असलेल्या अजय थोरात हा शेती करीत होता. त्याचे वडील बापूराव थोरात यांच्या नावे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेतून दीड लाख रुपयांचे पीक कर्ज घेऊन शेतात पेरणी केली होती. पेरणी नंतर पावसाने घेतलेली ओढ आणि मागील आठवड्यापासून अतिवृष्टी व संततधार पावसाने पिकाचे उत्पन्न निघाले नाही, तर वडिलांच्या नावावरील बँकेचे घेतलेले पिक कर्ज कसे फेडायचे ? या विचाराने अजय थोरात चिंताग्रस्त बनला होता.
या नैराश्यातून अजय थोरात याने टोकाची भूमिका घेऊन आपल्या राहत्या घरातील लोखंडी आडूला साडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याचे गुरुवारी सकाळी १०:०० वा. उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुकुमार उर्फ राकेश बनसोडे, बिट जमादार बाबासाहेब बांगर यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.
प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली माळी येथे शवविच्छेदन केल्या नंतर त्याच्या पार्थिवावर सार्वजनिक स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.