

आष्टी : धामणगाव येथील ४२ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशोक लक्ष्मण लोखंडे असे शेतकऱ्याचे नाव आहे. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांच्या पत्नी अश्विनी अशोक लोखंडे यांनी आष्टी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
व्याजाने घेतलेल्या पैशांच्या वसुलीवरून मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेल्या फिर्यादीनुसार, ६ सप्टेंबर रोजी अशोक लोखंडे गावात गेले होते. दुपारी घरी परतल्यानंतर त्यांनी बबन सोनबा लोखंडे व राहुल बबन लोखंडे यांनी व्याजाने घेतलेल्या पैशांच्या कारणावरून गावात शिवीगाळ व धक्काबुक्की करत मारहाण केल्याचे पत्नीला सांगितले. तसेच पैसे संध्याकाळपर्यंत न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्यांनी सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यानंतर अशोक लोखंडे हे नागतळा येथे विष्णु मारुती सोनवणे व राजेंद्र रामचंद्र गोरे यांच्याकडे उसने दिलेले पैसे मागण्यासाठी गेले. सायंकाळी त्यांनी पत्नीला फोन करून पैसे मागितल्यावर संबंधित दोघांनी शिवीगाळ करत चापट व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे सांगितले. त्याच फोनवर आपण विष प्राशन करीत असल्याचे सांगून त्यांनी फोन बंद केल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी नागतळा परिसरात शोध घेतला असता काळा चबुतरा-पाटसरा रस्त्यावर अशोक लोखंडे हे विषारी औषध प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने आष्टी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी श्रीसाई हॉस्पिटल, आष्टी येथे हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच ११ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे धामणगाव परिसरात खळबळ उडाली असून, मारहाण, मानसिक त्रास आणि धमक्यांना कंटाळून अशोक लोखंडे यांनी जीवन संपवल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने फिर्यादीत केला आहे. या फिर्यादीवरून बबन सोनबा लोखंडे, राहुल बबन लोखंडे, विष्णु मारुती सोनवणे आणि राजेंद्र रामचंद्र गोरे यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून, घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी आणि जबाबदार व्यक्तींबाबतचा तपास पोलिसांच्या पुढील कारवाईनंतर स्पष्ट होणार आहे. प्रकरणाचा पुढील तपास आष्टी पोलिस करीत आहेत.