

गौतम बचुटे
केज : बापाने दारू का पिला असे विचारताच?, पोटच्या पोराने रागाने आपल्या बापाला कुऱ्हाडीने डाव्या हातावर वार केला. मात्र दुसरा वार डोक्यात करीत असताना सुदैवाने कुऱ्हाड दांड्यातून निखळून खाली पडल्याने बापाचा जीव वाचला.
केज पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या धारूर तालुक्यातील गांजपूर येथील भारत तुकाराम धोंगडे यांचा मुलगा नितीन घोंगडे याला दारु पिण्याची सवय आहे. दि.५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७:३० वा.चे. सुमारास तो दारु पिऊन घरी आला. म्हणून त्याचे वडील भारत धोंगडे यांनी "तु दारु पिऊन का आलास?" असे विचारले म्हणून त्याला राग आला आणि नितीन धोंगडे यांनी त्याच्या वडिलांना शिवीगाळ करुन कुऱ्हाडीने डाव्या हातावर वार करुन जखमी केले. नितीन धोंगडे हा त्याच्या बापाच्या डोक्यात कुऱ्हाडीचा दुसरा वार घालीत असताना अचानक दांड्यामधून कुऱ्हाड निघून पडली आणि सुदैवाने त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडी ऐवजी दांडा लागल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र दांडा डोक्यात लागल्याने त्यांचे डोके फुटले आणि ते खाली पडले.
भारत धोंगडे यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र युसुफवडगाव येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार करण्यात आले. भारत धोंगडे यांच्या तक्रारीवरून नितीन धोंगडे याच्या विरुद्ध युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गु. र. नं. ३०५/२०२५ भा. न्या. सं. ११५(३), ११८(१), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल केशव खाडे हे तपास करीत आहेत.