

अंबाजोगाई :- अंबाजोगाई तालुक्यातील गित्ता येथील शुभांगी शिंदे हुंडाबळी प्रकरणातील राजकिय वरदहस्त असलेल्या फरार आरोपीस तात्काळ अटक करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. जेणेकरून समाजात अन्य कोणीही हुंडा घेणे किंवा देणे या प्रकारास आळा बसेल या प्रकारच्या मागणीचे निवेदन सजग अंबाजोगाईकरांच्या वतीने उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांना दिले आहे.
हे निवेदन देतांना मनस्विनी महिला प्रकल्पाच्या अरुंधती लोहिया, रोटरी क्लबचे धनराज सोळंके, इनरव्हील क्लबच्या श्रीमती खंडाळे मॅडम, , डॉ नरेंद्र काळे, आय एम इ चे डॉ.राजेश इंगोले, साहीत्य परिषदेचे डॉ.राहुल धाकडे, शिक्षक मैत्री प्रतिष्ठाण चे अध्यक्ष विजय रापतवार यांच्यासह शुभांगी शिंदेचा भाऊ प्रदीप साळुंके यांच्यासह अंबाजोगाई तालुक्यातील जेष्ठ नागरिक संघाचे ऍड अनंत जगतकर यांच्यासह शहरातील विविध शाळातील अनेक विद्यार्थिनी , शिक्षक तथा शिक्षिका यांच्यासह अनेक अंबाजोगाई कर सहभागी झाले होते.
एकेकाळी पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या राज्यात सातत्याने अमानुष घटनांची नोंद होत आहे. मागील काही दिवसात महाराष्ट्रभर गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे हीला हुंड्यासाठी छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे प्रकरण गाजत असतानाच अंबाजोगाई तालुक्यात हुंडाबळीची अशीच एक घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. धारूर येथील मोहखेड माहेर असलेली शुभांगी संतोष शिंदे या उच्चशिक्षित विवाहितेस हुंड्यासाठी छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना नुकतीच घडली आहे.
शुभांगी चा विवाह गीत्ता गावच्या संतोष शिंदे यांच्याशी 2022 मध्ये संपन्न झाला. त्यावेळी वर पक्षाकडनं केलेल्या मागणीनुसार हुंडा दिलेला असताना सतत पैशाची मागणी केली जात होती. माहेरून पैसे घेऊन ये असा दबाव तिच्यावर आणून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. शुभांगी चा मृत्यू हा संशयास्पद आहे. अशा आशयाची फिर्यादही तिच्या भावाने पोलिसांमध्ये केलेली आहे. हुंडा प्रतिबंध अधिनियम 1962 लागू होऊन देखील आजही सर्व जाती-धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात हुंडा घेतला जातो आणि त्याचाच परिणाम महिला व मुलांच्या शोषणामध्ये होतांना दिसून येतो.
बालविवाह, कौटुंबिक हिंसा आणि बाल लैंगिक अत्याचार या समस्यांना हुंडा ही सामाजिक कूप्रथा अनेकदृष्टीने कारणीभूत आहे. या कूप्रथेचा वापर करून नवविवाहितांचा छळ करणाऱ्या व्यक्ती आणि कुटुंबाचा तीव्र निषेध करत असल्याचे आपल्या निवेदनाद्वारे सजग अंबाजोगाई करांनी सांगितले. यावेळी अनेकांनी आपली मनोगत व्यक्त करत शुभांगी शिंदे तसेच वैष्णवी हगवणे यांना श्रद्धांजली अर्पण करत सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देखील उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केली.