

Beed Domestic and foreign liquor stock seized in Vadwani
वडवणी, पुढारी वृत्तसेवाः नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर नशेच्या अतिरेकातून उद्भवू शकणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ऑपरेशन न्यू इयर राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत हॉटेल, बिअर बार, पान टपऱ्या तसेच संशयित ठिकाणी पोलिस प्रशासनाकडून कडक तपासणी सुरू आहे.
याच अनुषंगाने वडवणी पोलिसांनी परडी, माटेगाव व देवडी परिसरात छापे टाकून देशी व विदेशी दारूचा अवैध साठा जप्त केला. देवडी येथील श्रीराम भीमराव झाटे यांच्या घरातून सुमारे १५ हजार रुपये किमतीचा विदेशी दारूसाठा, तर हॉटेल क्रांती येथे सुखदेव शेंडगे यांच्याकडून ५ हजार रुपये किमतीचा दारूसाठा असा एकूण २० हजार रुपयांचा देशी विदेशी दारूचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
या प्रकरणी संबंधितांविरोधात कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई वडवणी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू राठोड, पोलीस उपनिरीक्षक श्याम गायकवाड तसेच पोलीस अंमलदार वसंत करे यांनी केली. नववर्ष साजरे करताना नशेपासून दूर राहून कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे, असे आवाहन वडवणी पोलिसांकडून करण्यात आले आहे.