

MLA Dhananjay Munde gets relief; the complaint against the affidavit has been dismissed.
परळी, पुढारी वृत्तसेवा :
विधानसभा निवडणूक २०२४ मधील उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत दाखल करण्यात आलेली तक्रार परळी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या निकालामुळे राज्याचे माजी कृषिमंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. करुणा शर्मा यांनी याबाबत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली होती.
विधानसभा निवडणुकीवेळी आ. धनंजय मुंडे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात (शपथपत्रात) नमूद केलेली माहिती चुकीची असल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला होता. या आधारे त्यांनी लोकप्रतिनिधी अधिनियमांतर्गत मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारी खासगी फिर्याद दाखल केली होती.
न्यायालयाचा निकाल
या प्रकरणाची सुनावणी परळी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर पार पडली. यावेळी करुणा शर्मा यांचा जबाब नोंदवण्यात आला आणि दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद झाला. उपलब्ध कागदपत्रे आणि वस्तुस्थिती पडताळून पाहिल्यानंतर न्यायालयाने करुणा शर्मा यांनी केलेले सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे स्पष्ट केले.
पुराव्यांअभावी आणि तथ्य नसल्याने न्यायालयाने शर्मा यांची फिर्याद बुधवारी (दि.३१) फेटाळून लावली. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या वतीने अॅड. अशोक कवडे यांनी काम पाहिले, तर त्यांना अॅड. हरिभाऊ गुट्टे यांनी सहाय्य केले.