

शशी केवडकर
बीड : बीड जिल्ह्यावर पुन्हा एकदा पावसाने रुद्रावतार धारण केला असून रात्रीपासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. मागील आठ दिवसांपासून थांबता-थांबता सुरू असलेल्या या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आधीच्या पावसात शेतकऱ्यांचे पीक आणि जनावरं उध्वस्त झाली होती, संसार उद्ध्वस्त झाला होता, तरीही शेतकरी जगण्याची उमेद धरून होता. मात्र काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ही शेवटची आशेची किरणेदेखील संपुष्टात येत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांचा आक्रोश – “कापसाच्या वाती, सोयाबीनची माती”
कापूस, सोयाबीन, तूर, मूग अशी खरीपाची पिके आधीच सडली होती. आता सततच्या पावसामुळे उरलीसुरली पिकेही नष्ट होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. “कधी पिकं वाचावीत म्हणून देवाकडे साकडे घालणारा बळीराजा आता किमान आम्ही तरी जगू दे, म्हणून पाऊस थांबन्यायासाठी देवाची प्रार्थना करताना दिसतोय..!
जिल्ह्यातील अनेक भागांत घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड सुरू झाली आहे. मुख्य रस्ते आणि गावांना जोडणारे छोटे-मोठे पूल पाण्याच्या प्रवाहात वाहून जात आहेत. गेवराई, माजलगाव, केज, धारूर, वडवणी, शिरूर आणि बीड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक गावे पाण्याच्या वेढ्यात अडकली आहेत. घरांच्या पडझडी मध्ये अनेक जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना ह्या आता समोर येत आहेत. तर ग्रामीण भागात ग्रामस्थांच्या मोटार सायकल, शेती औजारे, ट्रॅक्टर ट्रॉली हे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत.
माजलगाव धरण, मांजरा धरण, बिंदुसरा व सिंदफना प्रकल्प शंभर टक्के भरले असून दरवाजे उघडण्यात आले आहेत. या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने थैमान घातलेल्या भागाबरोबरच कोरड्या भागातही या विसर्गाचे पाणी गावात शिरून नागरिकांना बेघर करत आहे. माजलगाव धरणातून ही वृत्त लिखाण करे पर्यंत 96795 क्युसेक ने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून मांजरा धरणातून 35889 क्युसेकने विसर्ग होत आहे. बिंदुसरा, सिंदाफना, डोकेवाडा ही धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे नद्यांनी पात्र सोडून महापुराचे रूप धारण केले आहे.
पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांत तात्पुरते निवारा केंद्र उघडले आहेत. मात्र या शाळांत पुरेशा सुविधा नसल्याने तेथील लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात अशी सर्व तालुक्या मध्ये निवारा केंद्र सुरू करण्यात आली असून अतिवृष्टीचा फटका बसलेल्या गावा मध्ये तसेच ज्या ठिकाणी पाण्यात गावे आहेत त्या गावाजवळील सुरक्षित अशा ठिकाणी हे केंद्र सुरू केले आहेत.
सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटनादेखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येत असून जेवण, आरोग्यसेवा व पिण्याचे पाणी यासाठी कार्यरत आहेत. या बरोबरच काही पक्षातील नेत्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे त्या त्या परिसरात वाटप सुरू केले आहे. असे वाटप अजून मोठ्या प्रमाणावर करण्याची गरज असल्याने प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. भाजपच्या वतीने सध्या अनेक ठिकाणी असे वाटप करण्यात येत असून बीड तालुक्यात संदीप क्षीरसागर, योगेश क्षीरसागर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी असे वाटप सुरू केले आहे.
“कोणालाही कुठल्याही प्रकारची मदत हवी असल्यास जवळील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधा. विनाकारण पाण्याच्या दिशेने जाऊ नका, पाण्याखाली गेलेल्या पुलांवरून प्रवास करू नका. आपली जनावरं सुरक्षित ठिकाणी हलवा व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.”
सध्या बीड जिल्ह्यात पावसाचे प्रचंड थैमान सुरू असून, जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. शेतकरी, ग्रामस्थ, प्रशासन आणि सामाजिक संस्था – सगळे मिळून या संकटाशी लढा देत आहेत. मात्र पाऊस थांबत नाही तोवर “जगण्याची लढाई” अधिक भीषण होणार असेच चित्र दिसत आहे.