

Dharur Sugarcane Workers Rescue
अतूल शिनगारे
धारूर : धारूर तालुक्यात उत्तर प्रदेशातील १५ मजुरांना ऊसतोडीच्या कामासाठी आणून त्यांच्याकडून विनामोबदला काम करून घेत, मारहाण व जीवे मारण्याच्या धमक्या देत डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार माजलगावचे उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले व धारूरचे नायब तहसीलदार सुरेश पाळवदे यांनी बुधवारी सायंकाळी तातडीची कारवाई करून सर्व मजुरांची सुटका केली. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धारूर तालुक्यातील आमला–हिंगणी (बु.) येथील ओम चंद्रकांत सोळंके याने एका व्यक्तीच्या मदतीने उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातील काही मजुरांना नोव्हेंबरमध्ये ऊसतोडीसाठी आणले होते. मात्र, काम करून घेत असताना त्यांना कोणताही मोबदला देण्यात आला नाही. मजुरीची मागणी केल्यास त्यांना मारहाण केली जात होती तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या.
या प्रकाराची माहिती ललितपूर जिल्हाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याशी पत्र व दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकात नायब तहसीलदार सुरेश पाळवदे, मंडळ अधिकारी लहु केदार, सोपान वाघमारे, संबंधित तलाठी तसेच दिंद्रुड पोलीस यांचा समावेश होता. पथकाने तात्काळ छापेमारी करत सर्व १५ मजुरांची मुक्तता केली.
सुटका करण्यात आलेल्या मजुरांना माजलगाव तहसील कार्यालयात आणून त्यांच्या जेवण व मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली. एक रात्र विश्रांती दिल्यानंतर विशेष वाहनाद्वारे त्यांना त्यांच्या मूळ गावी, उत्तर प्रदेशात सुरक्षितपणे रवाना करण्यात आले.
दरम्यान, आरोपी ओम चंद्रकांत सोळंके याच्याविरुद्ध दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार सिद्धेश्वर डोईफोडे तपास करत आहेत. आरोपी सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
इंगोले–पाळवदे यांची तत्पर कारवाई
उत्तर प्रदेशातील मजुरांना डांबून ठेवून त्यांच्याकडून विनामोबदला काम करून घेत असल्याची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. नायब तहसीलदार सुरेश पाळवदे व महसूल प्रशासनाच्या पथकाने दिंद्रुड पोलिसांच्या मदतीने धडाकेबाज कारवाई करत सर्व मजुरांची सुटका केली.
मजुरांची सुरक्षित रवानगी
मुक्त करण्यात आलेल्या मजुरांची माजलगाव येथे जेवण व मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर एक रात्र विश्रांतीनंतर विशेष वाहनातून त्यांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आले. या कार्याबद्दल उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले, नायब तहसीलदार सुरेश पाळवदे व संपूर्ण पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.