

Beed Crime News: Car driver robbed at knifepoint
केज, पुढारी वृत्तसेवा : रात्रीच्या वेळी रस्त्यावर थांबणे किती धोकादायक ठरू शकते, याचा धक्कादायक अनुभव अंबाजोगाई तालुक्यातील एका व्यावसायिकाला आला आहे. युसूफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत लघुशंकेसाठी गाडी थांबवलेल्या स्विफ्ट डिजायर चालकाला मध्यरात्री चौघा अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली आहे. या लुटीत सोन्याचे दागिने, लॅपटॉप व रोख रक्कम मिळून सुमारे ४ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द येथील रहिवासी श्रीराम सतीश ढगे यांचा अंबाजोगाई शहरातील आरकनगर येथे योगेश्वरी ट्रेडिंग कंपनी नावाचा शालेय बॅग तयार करण्याचा कारखाना आहे. दि. ५ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे काम आटोपून ते रात्री सुमारे १०.३० वाजता आपल्या स्विफ्ट डिजायर कारमधून लोखंडी सावरगाव मार्गे धानोरा खुर्दकडे निघाले होते.
दरम्यान, अंकुर फाटा येथून धानोरा खुर्द रोडकडे वळल्यानंतर सुमारे १०० फूट अंतरावर, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांनी लघुशंकेसाठी गाडी थांबवली. त्या वेळी ते मोबाईलवर बोलत असताना अचानक एक अनोळखी इसम पाठीमागून आला व तू कुठला आहेस दादा? असे विचारू लागला. संशय आल्याने श्रीराम ढगे पुन्हा गाडीत बसू लागले, तोच दुसरा साथीदार धावत आला व याला धर, याला घर असे म्हणत गाडीची चावी काढून घेतली.
आरोपींनी श्रीराम ढगे यांच्या नरड्याला चाकू लावून त्यांच्याकडील दोन्ही मोबाईल फोन हिसकावून घेतले. त्यानंतर आणखी दोन साथीदार घटनास्थळी आले. हे चौघेही श्रीराम ढगे यांच्या कारमध्ये बसले आणि चाकूचा धाक दाखवत, हातातील तीन सोन्याच्या अंगठ्या, गळ्यातील सोन्याचे लॉकेट, पँटच्या खिशातील १५ हजार रुपये रोख, तसेच गाडीत ठेवलेला लॅपटॉप जबरीने काढून घेतला.
लूट केल्यानंतर आरोपींनी मोबाईल फोन परत देत लोखंडी सावरगावच्या दिशेने पळ काढला. हे सर्व आरोपी २५ ते ३० वर्ष वयोगटातील असल्याचे वर्णन फिर्यादीने केले आहे. या प्रकरणी ढगे यांच्या तक्रारीवरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भिमराव मांजरे हे करीत आहेत. दरम्यान, रात्रीच्या वेळी एकाकी रस्त्यांवर वाढलेल्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस गस्त वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.