

Pomegranate Farming Success
शरद रेडेकर
आष्टी : पारंपरिक शेतीबरोबरच फळबागांची लागवड आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास शेतीही मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते, हे धामणगाव येथील प्रगतिशील शेतकरी बबन अण्णा चौधरी यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांनी दीड एकर क्षेत्रात शरद किंग-३ जातीच्या डाळिंबाची बाग फुलवत पहिल्याच प्लॉटमधून तब्बल २३ लाख रुपयांचे उत्पादन घेऊन परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
चौधरी यांनी माळरानावरील दीड एकर क्षेत्रात सुमारे ६०० डाळिंबाच्या झाडांची लागवड केली आहे. रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर, नियोजनबद्ध सिंचन व्यवस्था आणि बागेची सातत्यपूर्ण निगा यामुळे फळांचा दर्जा उत्कृष्ट राखण्यात त्यांना यश आले. परिणामी बाजारपेठेत त्यांच्या डाळिंबाला चांगला दर मिळाल्याने विक्रमी उत्पन्न मिळाले.
दरम्यान, डाळिंब बागेच्या उत्पन्नातून त्यांचे चिरंजीव संपत चौधरी यांनी तालुक्यातील पहिली टाटा सियारा खरेदी केली आहे. शेतीतूनही मोठे आर्थिक यश मिळवता येते, हा विश्वास चौधरी कुटुंबाने आपल्या यशस्वी प्रयोगातून दृढ केला असून, त्यांच्या या कामगिरीचे परिसरातील शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील जाणकारांकडून कौतुक होत आहे.
शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता आंतरपिकांसह डाळिंबासारख्या फळबागांकडे वळणे आवश्यक आहे. सेंद्रिय शेतीमुळे उत्पादनाचा दर्जा सुधारतो आणि बाजारातही अधिक भाव मिळतो. योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर शेतीतून निश्चितच आर्थिक प्रगती साधता येते.
बबन अण्णा चौधरी, प्रगतशील शेतकरी