

परळी वैजनाथ : परळी तालुक्यात डोक्यात कोयत्याचे घाव घालून तरूणाची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना गुरूवारी (दि.२१) परळी तालुक्यातील जळगव्हाणच्या रत्ननगर तांडा येथे उघडकीस आली. भीमराव शिवाजी राठोड (वय २६) असे या खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या करण्यात आली असून याप्रकरणी नातेवाईक आरोपी अनिल बाबासाहेब चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेने पुन्हा एकदा परळी तालुक्यात खळबळ माजली.
याबाबत अधिक माहिती अशी, अनिल चव्हाण आणि मृत भीमराव राठोड हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. यांच्यात घरगुती वाद अनेक दिवसांपासून सुरू होता. यातूनच ही हत्या झाली. अनिलने भीमरावला जळगव्हाण येथील रत्ननगर तांडा येथे बोलवून घेतले. येथे त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी अनिलने जवळ असलेल्या कोयत्याने भीमरावच्या डोक्यात अनेक वार केले. या हल्ल्यात भीमरावचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी अनिल चव्हाण घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.