

माजलगाव : तालुक्यातील घळाटवाडी शिवारात दोन मेंढपाळ बांधवांवर हल्ला झाल्याची घटना दि. 11 बुधवारी घडली असून या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी सकल धनगर ओबीसी समाजाच्या वतीने ग्रामीण पोलिसांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या घटनेची दखल घेऊन धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके आज माजलगाव येथे येणार आहेत.
ग्रामीण पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वडवणी तालुक्यातील पुसरा येथील मेंढपाळ निवृत्ती चंदू बिडे व लहू चंदू बिडे हे माजलगाव तालुक्यातील घळाटवाडी शिवारात मेंढ्या चारत असताना मोटरसायकला मेढ्यांचा धक्का लागला. मोटरसायकल पडल्यामुळे झालेल्या वादातून शिवीगाळ गणेश पांडुरंग नरवडे व आनंद पांडुरंग नरवडे यांनी या दोघांवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन्ही मेंढपाळांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे सकल धनगर ओबीसी समाजात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अन्यथा दि. १२ गुरुवार पासून ग्रामीण पोलीस स्टेशनसमोर सकल धनगर ओबीसी समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विलास नेमाने, संतोष देवकते, अविनाश कांडुरे, अर्जुन भुतकर, विशाल देवकते राज अर्जुन, विजय धायगुडे, कल्याण कस्पटे शंकर गावडे दत्ता आबुज मनोज कोरडे यांनी दिला आहे.