

केज :- बीड जिल्ह्यात आलेल्या पवनचक्क्या आणि सोलार प्रकल्प उभारण्यासाठी कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. त्याचा मोबदला म्हणून सोलार पॉवर कंपनीने शेतकऱ्यांना चेक देऊन फसविल्याचे प्रकार उघडकिस आला आहे. फसवणुकी प्रकरणी सबंधित शेतकऱ्याने कंपनीच्या विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
केज तालुक्यातील नांदुरघाट परिसरात टोरँटो सोलार पॉवर कंपनी मार्फत प्रकल्प उपभारणीचे काम सुरू आहे. या कंपनीने नांदुरघाट येथील शेतकरी सुभाष धारोबा आरडे यांच्या मालकीच्या शेत जमिनीत टॉवर व लाइन टाकण्याचे काम असल्याने त्यांना नुकसान व मोबदल्या पोटी एक करारनामा करून त्यांना ३ लाख ४९ हजार ९८० रु. चा चेक दिला.
त्या नंतर सुभाष आरडे यांनी तो चेक वटविण्यासाठी त्यांचे खाते असलेल्या बँकेत जमा केला. परंतु बँकेने मेमो देऊन चेक देणाऱ्याने पेमेंट थांबविण्याच्या कारण देऊन चेक न वटता मूळ चेक व मेमोसह परत दिला. सुभाष आरडे यांनी ही बाब कंपनीच्या निदर्शनास आणून दिली आणि पुन्हा दुसऱ्यांदा चेक जमा केला. पुन्हा त्याच कारणाने चेक न वटता मेमोसह परत करण्यात आला आहे.
म्हणून सुभाष आरडे यांनी चेक बाऊन्स प्रकरणी एनर्जी इन्फ्रा प्रायव्हेट लिमीटेड संचालक अमितस्वरूप गुप्ता, सचिन शिवाजी शिंदे आणि अनंत रामचंद्र काळकुटे यांना नोटीस पाठविली आहे. जर १५ दिवसात संपूर्ण रक्कम आणि नोटिसीचा खर्च दिला नाही तर खटला दाखल करण्याची तंबी दिली आहे.
पवनचक्क्या कंपन्यांची मुजोरी
केज तालुक्यात एका पवन चक्की प्रकल्पासाठी खंडणी मागणाऱ्यांना विरोध केला म्हणून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला होता. त्या घटने पासून केज तालुक्यात काम करीत असलेल्या सोलार कंपन्या व सौर ऊर्जा कंपन्या यांची मुजोरी आणि मनमानी वाढलेली आहे. अशा कंपन्या शेतकऱ्यांना वेठीस धरून फसवणूक देखील करीत असल्याने शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत.
प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी अशा कंपन्यांवर अंकुश ठेवायला हवा
गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्याची फसवणूक करणाऱ्या अशा कंपन्या विरुद्ध लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी कठोर पावले उचलून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी. अशी मागणी होत आहे.