

Beed Crime News
उदय नागरगोजे
बीड : बीडमधील लिंबागणेश परिसरातील पवनचक्की प्रकल्पाच्या साईटवर गोळीबाराची घटना घडली. मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांवर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केला. यात एका चोरट्याचा मृत्यू झाला असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. मात्र, या घटनेनं पुन्हा एकदा बीडमधील पवनचक्की प्रकल्प चर्चेत आले आहेत.
लिंबागणेश येथे पवनचक्की प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी गुरुवारी मध्यरात्री काही जण चोरीच्या उद्देशाने आले होते. सुरक्षारक्षकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान सुरक्षारक्षकांनी केलेल्या गोळीबारात एका चोरट्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. चोरट्याची अद्याप ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, बीडमधील पवनचक्की प्रकल्प हे गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात चर्चेचा विषय आहे. हत्या, खंडणी, गुन्हेगारी, पवनचक्की उभारणाऱ्या कंपन्यांकडून ग्रामस्थांची होणारी फसवणूक अशा कारणांमुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असलेले प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात असतात. त्यात आता ही गोळीबाराची घटना घडल्याने भर पडली आहे.