

Beed Crime
बीड : येथील कोचिंग क्लासमधील अत्याचार प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. ''त्या कोचिंग क्लासच्या मालकाला आमदार संदीप क्षीरसागर पदोपदी मदत करायचे? त्यांचा राजाश्रय होता ह्यांना?'' असा सवाल दमानिया यांनी X वर पोस्ट करत उपस्थित केला आहे. या प्रकरणातसुद्धा सक्त कारवाई होणे गरजेचे आहे. सगळ्या CDR ची तपासणी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
नीट परीक्षेची तयारी करत असलेल्या १७ वर्षीय विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी शिक्षक विजय पवार याला राजकीय पाठबळ आहे, असा गंभीर आरोप याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी केला होता. विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय असल्याचा दावा करण्यात आला आहे.
बीडमधील एका शैक्षणिक संकुलात विद्यार्थिनीसोबत लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली. येथील एका शैक्षणिक संकुलात अल्पवयीन विद्यार्थीनीला क्लासेसच्या केबीनमध्ये बोलावून तिचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात प्रा. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना शनिवारी मध्यरात्री अटक करण्यात आली होती. त्यांना १ जुलैपर्यंतची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
येथील एका शैक्षणिक संकुलात नीट तयारीसाठी शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थीनीला प्रा. विजय पवार व प्रशांत खाटोकर यांनी केबीनमध्ये बोलावून तिच्याशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला. हा प्रकार गेल्यावर्षी जुलै महिन्यापासून सुरु होता.
पीडीत विद्यार्थीनीने याबाबत पालकांना माहिती दिली. त्यानंतर पालकांनी पोलिस शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी विजय पवार आणि खाटोकर याला अटक करण्यात आली.