

Beed Crime News: Former sarpanch from Kaij arrested in Tamil Nadu in a counterfeit currency case
केज, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्याच्या गुन्हेगारी जगतातील एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून, केज तालुक्यातील डोका गावाचा माजी सरपंच थेट तामिळनाडू राज्यात बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये अडकला आहे. तमिळनाडू पोलिसांनी माजी सरपंचासह एका व्यापाऱ्याला सव्वाआठ लाख रुपयांच्या बनावट नोटांसह बेड्या ठोकल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
रमेश बाबूराव भांगे (५४, रा. डोका, ता. केज माजी सरपंच) आणि नारायण राम (३४, व्यापारी) हे दोघे कारने तामिळनाडू दौऱ्यावर होते. २१ जानेवारी रोजी तिरुचिरापल्ली येथील थुवकुडी परिसरातील एका पेट्रोल पंपावर त्यांनी इंधन भरले आणि २०० रुपयांची बनावट नोट दिली. ही नोट पाहताच कर्मचाऱ्याला संशय आला आणि त्याने तात्काळ स्थानिक पोलिसांना कळवले. पोलिसांनी वेगाने हालचाली करत चेकपोस्टवर कार अडवली.
या प्रकरणाचे गांभीर्य पाहून तामिळनाडू पोलिसांनी याचा तपास सीआयडीकडे सोपवला आहे. या बनावट नोटांची छपाई कुठे झाली? याचे महाराष्ट्रातील आणि विशेषतः बीडमधील कनेक्शन काय आहे? याचा सखोल शोध आता घेतला जात आहे. माजी लोकप्रतिनिधीच अशा देशविघातक कृत्यात सहभागी असल्याचे समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, केज तालुका पुन्हा एकदा नकारात्मक कारणाने चर्चेत आला आहे.
कारमध्ये सापडली बनावट नोटांची बंडले
पोलिसांनी कारची झडती घेतली असता, त्यात २०० रुपयांच्या नोटांचे तब्बल ४१ बंडल मिळून आले. एकूण ८ लाख ३७ हजार रुपयांच्या या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. प्राथमिक तपासात या आरोपींनी मदुराई, पुदुक्कोट्टई आणि तंजावर परिसरातही अनेक ठिकाणी बनावट नोटा चलनात आणल्याचे उघड झाले आहे.