

नेकनूर : येथील आठवडे बाजारातील सोन्या चांदीच्या दुकानातून चोरट्याने सकाळी अकराच्या सुमारास पंधरा किलो चांदीचे दागीने असलेली बॅग लंपास केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पालातील दुकान लावण्याची तयारी करीत असलेल्या बबन कानडे या सराफ व्यावसायिकाला चोरट्यांनी लक्ष केले.
नेकनूरचा आठवडे बाजार मराठवाडयात प्रसिद्ध असून आठवड्याला भरणारी एक प्रकारे जत्राच आहे . या ठिकाणी सोन्यापासून सुई पर्यंत सर्वच गोष्टी मिळतात .या ठिकाणी जनावरांचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर आठवडे बाजार आहे तसेच इतर दुकाना बरोबर या ठिकाणी आठवडे बाजारात सोन्या-चांदीचे दुकाने सुद्धा पालामध्ये लावलेली असतात .
बाजारकरू बरोबर चोरटेही बाजारात फिरत आसतात. रविवारी सकाळी ११ च्या सुमारास सोन्या-चांदीचे व्यापारी बबन पांडुरंग कानडे हे आपल्या बाजारातील पालात असलेल्या सोन्याच्या दुकानात दुकान लावण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांच्याकडे चांदीचे दागिने असलेली बॅग सुद्धा होती . बाजारात दुकान लावत असताना काही कळायचे आत चोरट्याने ही पंधरा किलो चांदीचे दागिने असलेली बॅग लंपास केली यामध्ये ५० हजार रुपये रोख सुद्धा होते .
या घटनेने खळबळ उडाली असून दुकानाच्या आसपास मोठ्या प्रमाणात गर्दी झाली पण तोपर्यंत चोरटे पसार झाले होते . येथील बाजारात आतापर्यंत पर्स, सोन्याचे दागिने, पैसे, यासारख्या वस्तू चोरीला जाण्याच्या घटना घडत होत्या. रविवारी संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या बाजारात वीस लाखाच्या आसपास चांदीचे दागिने आसलेली बॅग लंपास केली. पोलिसांनी लागलीच धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले आहेत.