

Neknur Police Action
नेकनूर : राज्यात बंदी असलेला विविध प्रकारचा गुटखा धुळे-सोलापूर महामार्गावरून पिकअप मध्ये जात असल्याची माहिती नेकनूर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मध्यरात्री एक वाजता केलेल्या कारवाईत पिकअपला धडकलेल्या स्विफ्टमध्येही गुटखा आढळला. अपघात करून आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले. या कारवाईत दोन्ही वाहनासोबत वीस लाख एकाहत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेकनूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांना सुत्रामार्फत धुळे सोलापूर या मार्गावरून गुटख्याचा पिकअप जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रात्री एक वाजता सहकार्यांना घेऊन वानगाव परिसरात तळ ठोकला. पिकअप आढवताच त्यावर एक स्विफ्ट कार एम एच 01-बीटी 6144येऊन आदळली दोन्ही वाहन तपासत असताना आरोपींनी पळ काढल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
या दोन्ही वाहनात मोठ्या प्रमाणात गुटखा आढळला त्यामुळे हे एकच रॅकेट असल्याचा संशय पोलीस पोलीस व्यक्त करत आहेत. बाबा ,विमल ,रजनीगंधा गुटखा आणि वाहने असा वीस लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. बऱ्याच कालावधीनंतर नेकनूर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून हद्दीतील अवैध धंदे चालकांना यामुळे धसका बसणार आहे.ही कारवाई सपोनी चद्रकांत गोसावी उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकड, पो. कॉ.गोविंद राख, बाळासाहेब ढाकणे,राख, शहजादे आदींनी केली.