

Beed Crime News
गौतम बचुटे/केज : मामा मामीला भेटण्यासाठी आलेल्या २९ वर्षाच्या भाच्याने घरी कोणी नसताना रात्रीच्या वेळी मामाच्या दहा वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची निंदनीय घटना उघडकीस आली आहे. केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली आहे.
४ मे रोजी धाराशिव जिल्ह्यातील इटकुर (ता. कळंब) येथील एक २९ वर्षीय तरुण त्याच्या आजोळी मामा-मामीकडे आला होता. रात्रीच्या वेळी त्याचे मामा व मामी हे त्यांच्या दहा वर्षांच्या मुलीला भाच्यासोबत घरी ठेवून शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन नराधम भाच्याने पिडितेवर लैंगिक अत्याचार केला.
आई-वडील घरी आल्यानंतर चिमुकलीने घडलेल्या सर्व प्रकारची माहिती दिली. त्यावरून नराधमाविरुद्ध युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गु. र. नं. १२५/२०२६ भा. न्या. सं. ६४ (२), (एफ) (आय) (एम), ६५ (२) आणि पोक्सोचे कलम ४, ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत बर्डे हे तपास करीत आहेत.
बलात्कारानंतर आरोपी पळून गेला होता. त्याचा माग काढून पोलीस उपनिरीक्षक भारत बर्डे आणि त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल महेश कोकाटे आणि सोहेल पठाण यांनी आरोपीला मंगळवारी (दि. ५ मे) रात्री धाराशिव जिल्ह्यातील इटकुर येथून अटक केले आहे.