धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून गर्भपात

मर्दवाडीतील घटना ः सहाजणांवर गुन्हा; चौघांना अटक
Minor Gang Rape Case
अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून गर्भपातPudhari File Photo
Published on
Updated on

आष्टा : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिचा गर्भपात केल्याची घटना उघड झाली आहे. यात सहाजण संशयित आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. पैकी चारजणांना अटक झालेली आहे. या प्रकरणात आष्टा येथील एक शिक्षकही सहभागी आहे, तर गर्भपात करणारा डॉक्टर कर्नाटकातील आहे.

पीडिता मर्दवाडी (ता. वाळवा) येथील आहे. बदनामी करण्याची भीती दाखवून तिच्यावर दोन

वर्षांपासून सामूहिक अत्याचार करून तिचा बेकायदेशीर गर्भपात केल्याची नोंद झाली आहे. याप्रकरणी सांगली येथील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (महिला) रोहिणी महादेव वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे. आष्टा पोलिस ठाण्यात सहाजणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अटकेतील चार आरोपींना इस्लामपूर येथील न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सागर बाबुराव देशमुख (वय 23) नितीन आनंदा यादव (22), साईराज मोहन डांगे (23, सर्व रा. मर्दवाडी, वाळवा) यांच्यासह दोन अल्पवयीन मुले व एक महिला अशी संशयितांची नावे आहेत.

संशयितांनी जानेवारी 2024 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केला. मुख्य आरोपी सागर बाबुराव देशमुख याने पीडितेच्या घरात घुसून तिला, तुझी गावात बदनामी करेन अशी धमकी देऊन तिच्यावर सर्वप्रथम अत्याचार केला. त्यानंतर इतर आरोपींनीही तिला ब्लॅकमेल करून तिचे शोषण केले. यामध्ये काही अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिल्यानंतर एका महिलेसह अन्य आरोपींनी तिला कर्नाटक राज्यात नेऊन दोन अनोळखी महिलांच्या मदतीने तिचा बेकायदेशीरपणे गर्भपात घडवून आणला. जागरूक नागरिकांमुळे पोलिसांनी 10 दिवसांपूर्वी पीडितेला बाल संरक्षण अधिकाऱ्यासमोर हजर केले. गेल्या 10 दिवसांपासून पीडित मुलगी बालसुधारगृहात असून तिच्या चौकशीनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.

संतापजनक...

या सामूहिक अत्याचार प्रकरणात अन्य काही आरोपींसह एका नराधम शिक्षकाचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. मात्र, पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात उर्वरित आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आष्टा परिसरात सुरू आहे.

पैसे उकळल्याची चर्चा?

या प्रकरणातील सर्वात संतापजनक बाब म्हणजे, पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी एका कथित महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्याने मध्यस्थी करत आरोपींकडून लाखो रुपये उकळल्याची जोरदार चर्चा आहे. पीडितेच्या गरिबीचा आणि अगतिकतेचा फायदा घेऊन या प्रकरणाची सेटलमेंट करण्यासाठी हे पदाधिकारी आणि काही दलाल सक्रिय झाले होते. या भ्रष्ट साखळीमुळेच गुन्हा दाखल होण्यास 15 दिवसांचा विलंब लागल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे सोपवून, गुन्हेगारांना पाठीशी घालणारे पोलिस अधिकारी आणि सेटलमेंट करणारे पदाधिकारी यांची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पोलिसांचे दुर्लक्ष

पंधरा दिवसांपासून हे प्रकरण आष्टा परिसरात चर्चेत होते. मात्र, आरोपींमध्ये समाजातील प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यक्तींचा समावेश असल्याने माहिती मिळूनही पोलिसांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही जागरूक नागरिकांनी सांगली येथील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या अन्यायाला वाचा फोडली.

कोणाचे पाठबळ?

गर्भपात करणारा कर्नाटकातील डॉक्टर आणि त्याला मदत करणाऱ्या महिलांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. हे पैसेवाले आरोपी कोण? आणि त्यांना कोणाचे पाठबळ लाभत आहे? असा सवाल आता सर्वसामान्यांतून विचारला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news