

माजलगाव – येथील शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला कर्मचारी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकल्याने एकच खळबळ उडाली आहे.
माजलगाव शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी अमोल कदम हा बायपास रोडवरील लेंडाळ हॉस्पिटल समोर तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना जालना एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. या कारवाईमुळे शहर पोलीस दलात तसेच परिसरात एकच खळबळ माजली आहे.
प्राप्त माहितीनुसार, संबंधित काम करून देण्यासाठी अमोल कदम याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने जालना एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे लेंडाळ हॉस्पिटल समोर लाच स्वीकारत असतानाच एसीबीच्या पथकाने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, घटनेची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती एसीबीकडून देण्यात आली आहे.