

धारूर : धारूर शहरातील हनुमान मंदिर रोडवरील माऊली ज्वेलर्स या सराफा दुकानात सोन्याच्या मोडीच्या व्यवहारातून व्यापाऱ्याची तब्बल १८ लाख १५ हजार ४०० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सोन्याच्या नावाखाली चांदीवर सोन्याचा मुलामा दिलेली मोड देऊन १७ लाख ५० हजार रुपये उकळण्यात आले, तर यापूर्वी उधारीवर घेतलेल्या चांदीच्या दागिन्यांचे ६५ हजार ४०० रुपयेही बुडविण्यात आले. या प्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरुद्ध धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मदन साहेबराव धोतरे यांचे धारूर शहरात माऊली ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान आहे. २९ जुलै रोजी एका इसमाने साडेतीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी मोडण्यासाठी आणली होती. त्यानंतर २७ ऑगस्ट रोजी त्याने पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने मोडण्यासाठी आणले. या व्यवहारांतून त्याने व्यापाऱ्याचा विश्वास संपादन केला. राजस्थानमध्ये सोन्याचे दुकान असून महाराष्ट्रात जनावरांचा व्यापार करीत असल्याचेही त्याने सांगितले होते.
दरम्यान, २२ सप्टेंबर रोजी दोन इसमांनी दुकानातून २८४ ग्रॅम वजनाचे चांदीचे जोडवे व चैन, अशी ६५ हजार ४०० रुपयांची आभूषणे उधारीवर घेतली. सोन्याची मोड आणल्यानंतर त्यातून ही रक्कम वजा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. २४ सप्टेंबर रोजी दुपारी हे दोघे आणखी एका इसमासह दुकानात आले. त्यांनी १६३ ग्रॅम वजनाची सोन्याची मोड असल्याचे सांगून काही पावत्या व आधारकार्डची छायांकित प्रत दिली.
सुरुवातीच्या तपासणीत सोने असल्याचे वाटल्याने धोतरे यांनी डाग-बट्टा वजा करून १७ लाख ५० हजार रुपये दिले. मात्र, नंतर संबंधितांचे मोबाईल बंद आढळल्याने संशय आला. मोडीची पुन्हा तपासणी केली असता, तिच्या आतील भागात चांदी असल्याचे उघड झाले.याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल झाला असून, पोलीस उपनिरीक्षक श्रीनाथ गिराम पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे सराफा व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.