

बीड ः घरकुल लाभार्थ्यांच्या नावाखाली गेवराईच्या तहसीलदारांनी कोट्यवधी रुपयांचा अवैध वाळू उपसा केल्याचा आरोप आ.विजयसिंह पंडित यांनी केला होता. यानंतर आता जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्वतः या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पथक नियुक्त केले आहे. या माध्यमातून घरकुल लाभार्थ्यांच्या चौकशीबरोबरच गोदावरी नदीपात्राची ईटीएस मोजणी देखील केली जात आहे. याचा अहवाल मंगळवारी दुपारपर्यंत हाती येण्याची शक्यता असून त्यानंतर काय कारवाई केली जाणार आहे.
गेवराई तालुक्यातून गोदावरी नदी वाहते. या नदीतील वाळूचे अर्थकारण नेहमीच वादाचा विषय ठरलेले आहे. वाळूघाटाचा लिलाव झाला तरी वाद, नाही झाला तरी वाद हा ठरलेलाच आहे. या दरम्यानच शासनाच्या नियमानुसार घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू देण्यासाठी गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे वाळूघाट निश्चित करण्यात आलेला आहे.
या वाळूघाटाचे नियंत्रण तहसीलदारांकडे असून ज्या घरकुल लाभार्थ्यांला वाळू द्यायची आहे, त्याच्या ओटीपीच्या आधारे या ठिकाणाहून टिप्परमध्ये पाच ब्रास वाळू दिली जाते. परंतु या लाभार्थ्यांना ठरावीक रक्कम देत त्यांचा ओटीपी मिळवून भलत्याच ठिकाणी ही वाळू पाठवली गेल्याचा आरोप आ.पंडित यांनी केला होता.
हे करत असतांना टिप्परचे जीपीएस दुचाकीला लावले गेले, ती दुचाकी लाभार्थ्याच्या घरापर्यंत आणि टिप्पर दुसरीकडेच नेले गेले. याबरोबरच प्रत्यक्ष मंजुरीपेक्षा कितीतरी पट अधिक वाळू उपसा केला गेला आणि त्यातून कोट्यवधी रुपयांचा अपहार गेवराईच्या तहसीलदारांनी केल्याचा गंभीर आरोप आ.पंडित यांनी केला होता.
या तक्रारीची गंभीर दखल जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घेतली. सोमवारी सकाळीच नायब तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली दहा पथके तैनात करण्यात आली होती. या प्रत्येक पथकामध्ये एक नायब तहसीलदार, एक मंडळ अधिकारी व दोन तलाठी नियुक्त करून त्यांना थेट लाभार्थ्यांपर्यंत पाठवण्यात आले होते. सोळाशेहून अधिक लाभार्थी असल्याने सोमवारी दिवसभर हे काम सुरू होते.
तर दुसरीकडे गोदावरी पात्राचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आले, याबरोबरच ईटीएस मोजणीदेखील करण्यात आली असून याचा अहवाल मंगळवारी दुपारपर्यंत येणे अपेक्षित आहे. त्यानंतरच करण्यात आलेले आरोप आणि समोर आलेली परिस्थिती याचे मूल्यमापन करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
अहवाल आल्यानंतरच निर्णय ः जॉन्सन
गोदवरी पात्रातील वाळू उपशासंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारीनंतर आम्ही पथक नियुक्त केले आहेत. या पथकाच्या माध्यमातून लाभार्थ्यांची चौकशी केली जात आहे. याबरोबरच वाळूघाटाची ईटीएस मोजणी देखील करण्यात आली असून या सर्व चौकशीचा अहवाल मंगळवारी दुपारपर्यंत माझ्यापर्यंत येईल. त्यानंतर सर्व बाबींचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिली.
तक्रार झाली तरच चौकशी?
गेवराईतील अवैध वाळू उपशाबाबत आ.विजयसिंह पंडित यांनी तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत तातडीने कारवाई केली. परंतु एरव्ही अवैध वाळू उपशाबाबत ओरड होते, त्याची दखल मात्र घेतली जात नाही. महसूल व पोलिस प्रशासनातील काही अधिकारी मात्र यामध्ये मनमानी करताना दिसतात. तक्रार केली तरी काहीच होत नसल्याने सर्वसामान्य देखील हतबल झालेले दिसतात. तक्रार आली नाही तरी जिल्हा प्रशासन अथवा थेट विभागीय पातळीवरुन या वाळूघाटांची मोजणी व सत्य परिस्थिती अचानकपणे तपासली गेली पाहिजे, अशा प्रतिक्रिया या निमित्ताने व्यक्त केल्या जात आहेत.