Beed Crime : पोलिसासाठीच रचला सापळा! संशय येताच कारमधून ठोकली धूम

स्विफ्ट कार परत देण्यासाठी मागितली होती लाच; फरार पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
Police Bribe Case
पोलीस
Published on: 
Updated on: 

गेवराई : चोरीस गेलेली स्विफ्ट कार शोधून काढल्यानंतर ती तक्रारदाराच्या ताब्यात देण्यासाठी पाच हजारांची लाचेची मागणी करणाऱ्या गेवराई पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदाराने गुरुवारी (दि. २६) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात लाच स्वीकारली. मात्र, एसीबीच्या पथकाचा संशय येताच त्याने कारसह घटनास्थळावरून पलायन केले. पांडुरंग उत्तम दराडे असे फरार पोलीस अंमलदाराचे नाव असून, त्याच्याविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Police Bribe Case
Beed Crime | पित्यानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची स्विफ्ट कार चोरीस गेली होती. पोलिसांनी ही कार शोधून काढल्यानंतर ती परत मिळवून देण्याच्या मोबदल्यात पोलीस अंमलदार पांडुरंग दराडे याने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने बीड लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार दिली. याबाबत पडताळणी करून गुरुवारी बीड एसीबीच्या पथकाने गेवराई पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला.

दरम्यान, पोलीस ठाण्याच्या आवारात कारमध्ये बसलेल्या दराडे याने तक्रारदाराकडून कारमध्येच लाचेची रक्कम स्वीकारली. मात्र, एसीबीच्या पथकाची कारवाई सुरू होण्याची चाहूल लागताच त्याला सापळ्याचा संशय आला. त्यानंतर त्याने कारसह तेथून पलायन केले. त्यामुळे एसीबीच्या पथकासमोरच संबंधित पोलीस अंमलदार फरार झाल्याने परिसरात खळबळ उडाली.

याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यासह इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार पोलीस अंमलदार पांडुरंग दराडे याचा शोध सुरू आहे. बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार बिडकर, सुरवसे, पुरी आणि खरसाडे यांनी ही कारवाई केली.

Police Bribe Case
Chandrapur Crime | जुन्या वादातून हिंसक घटनेत तरुणाचा मृत्यू; वरोऱ्यातील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.