Beed teacher recruitment scam : बोगस शिक्षक भरती प्रकरणाला नवे वळण; पुराव्यासह दिलेल्या तक्रारीच 'गहाळ'?

सादेक इनामदार यांची एसआयटी प्रमुखांकडे थेट धाव; बीड एसपींकडून अहवाल मागविण्याचे निर्देश
Beed teacher recruitment scam
Beed teacher recruitment scampudhari photo
Published on
Updated on

बीड : बीड जिल्ह्यातील गाजत असलेल्या कथित बोगस शिक्षक भरती प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडे (ईओडब्ल्यू) आठ ते नऊ महिन्यांपूर्वी पुराव्यासह सादर केलेल्याच लेखी तक्रारी गहाळ झाल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पदाधिकारी इंजि. सादेक इनामदार यांनी केला आहे.

या संदर्भात त्यांनी पोहोच पावतीसह विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे तक्रार दाखल केली असून, या तक्रारीची गंभीर दखल घेत बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांच्याकडून सविस्तर अहवाल मागविण्याचे आणि प्रकरणाची सहानिशा करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती इनामदार यांनी दिली.

Beed teacher recruitment scam
Gutkha seizure washim : वाशिममध्ये ४ लाखांच्या सुगंधित गुटख्यासह मालवाहू गाडी जप्त

इनामदार यांच्या म्हणण्यानुसार, बीड जिल्ह्यातील कथित बोगस शिक्षक भरतीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे पुरावे, संबंधित कागदपत्रे आणि लेखी तक्रार त्यांनी आठ-नऊ महिन्यांपूर्वी जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर केली होती. मात्र, इतका कालावधी उलटूनही त्या तक्रारीवर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. उलट संबंधित तक्रारीच उपलब्ध नसल्याचे समोर येत असल्याने संपूर्ण प्रकरणावर संशय निर्माण झाला असल्याचा आरोप त्यांनी केला.

याबाबत एसआयटी प्रमुख डॉ. पुलकुंडवार यांच्यासमोर सविस्तर मांडणी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी बीड पोलिस अधीक्षकांना तक्रारीची वस्तुस्थिती तपासून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्याचे इनामदार यांनी सांगितले.

'एकाच दिवशी ६० हून अधिक शालार्थ आयडी'चा दावा

बीड जिल्ह्यातील भरती घोटाळा हा इतर जिल्ह्यांपेक्षा अधिक गंभीर असल्याचा दावा करत इनामदार यांनी एकाच दिवशी ६० हून अधिक शालार्थ आयडी तयार झाल्याचे लेखी पुरावे एसआयटी समोर सादर केल्याचे सांगितले. इतके गंभीर दस्तऐवजी पुरावे उपलब्ध करून दिल्यानंतरही तपासात अपेक्षित प्रगती न झाल्याने आणि मूळ तक्रारीच गहाळ झाल्याचा आरोप समोर आल्याने या संपूर्ण प्रकरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

राज्य शासनाच्या हस्तक्षेपाची अपेक्षा

ही बाब राज्य शासनाच्या निदर्शनास आणून दिली असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होईल, असा विश्वास सादेक इनामदार यांनी व्यक्त केला. दरम्यान, एसआयटीने मागविल्या जाणाऱ्या अहवालानंतर या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Beed teacher recruitment scam
Abhijeet Dipke: अभिजीत दिपकेंच्या परदेशी शिक्षणाचा खर्च कसा केला? माहिती अधिकार कार्यकर्त्याची चौकशीची मागणी

'पुढारी'च्या पाठपुराव्यानंतर चौकशीला वेग

बोगस शिक्षक भरती प्रकरणाचा मुद्दा 'दैनिक पुढारी'ने सातत्याने लावून धरल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीला गती मिळाली. त्यानंतर विविध स्तरांवर तपास सुरू झाला असून राज्यातील काही ठिकाणी संबंधित प्रकरणांत अटक व कारवाईही झाल्याचे इनामदार यांनी नमूद केले. मात्र, बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कथित अनियमितता झाल्याचा दावा असूनही स्थानिक स्तरावर दोषी अधिकारी, कर्मचारी किंवा संबंधितांविरोधात अपेक्षित कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

एसआयटी प्रमुख डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या निर्देशानंतर पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती संकलित करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आवश्यक कागदपत्रे, नोंदी व संबंधित बाबींची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे."

संतोष शेजाळ, प्रमुख, आर्थिक गुन्हे शाखा, बीड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news