

Ashti Rural Hospital Facilities Issue
राजू म्हस्के
कडा : आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयातील मूलभूत सुविधांची दुरवस्था समोर आली असून, रुग्णालय परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे. ठिकठिकाणी मावा, सुपारी आणि गुटखा खाऊन थुंकल्याचे डाग दिसत आहेत. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी बसविण्यात आलेल्या फिल्टरच्या नळाला हँडल नसल्याने रुग्णांना पाण्यासाठीही अडचणींचा सामना करावा लागत आहे. आरोग्य सेवा देणाऱ्या रुग्णालयातच स्वच्छता आणि सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
हिरकणी कक्षाला कुलूप; स्तनदा मातांची कुचंबणा
स्तनदा माता आणि नवजात बालकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेला 'हिरकणी कक्ष' चक्क कुलूपबंद असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, रुग्णालयाच्या ओपीडीच्या वेळेतही हा कक्ष बंद राहत असल्याने उपचार आणि लसीकरणासाठी येणाऱ्या मातांची मोठी गैरसोय होत आहे.
शासनाच्या नियमानुसार सार्वजनिक रुग्णालयांमध्ये स्तनदा मातांना आपल्या बाळांना सुरक्षित आणि निवांतपणे स्तनपान करता यावे, यासाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. आष्टी ग्रामीण रुग्णालयात परिसरातील वाड्या-वस्त्यांमधून दररोज मोठ्या संख्येने महिला उपचारासाठी तसेच बालकांच्या लसीकरणासाठी येतात. त्यांच्यासोबत तान्ही बाळेही असतात. मात्र, कक्षाला कुलूप असल्याने महिलांना गर्दीच्या ठिकाणी किंवा उघड्यावर बसून बाळांना स्तनपान करावे लागत आहे.
शासनाने लाखो रुपये खर्चून उभारलेली सुविधा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वापराविना पडून असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची तातडीने दखल घेऊन हिरकणी कक्ष नियमित खुला ठेवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसंग्रामचे बाबू धनवडे यांनी दिला आहे.
वैद्यकीय अधीक्षक लग्नसमारंभात; तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी
आष्टी ग्रामीण रुग्णालयात दर सोमवारी डोळे तपासणी शिबिराचे आयोजन केले जाते. त्यामुळे सोमवारी डोळ्यांच्या तपासणीसाठी आलेले ज्येष्ठ नागरिक तसेच अन्य आजारांवरील उपचारासाठी आलेल्या रुग्णांची मोठी गर्दी होती. मात्र, याचवेळी वैद्यकीय अधीक्षक नातेवाइकाच्या लग्नसमारंभासाठी व्यस्त असल्याची माहिती समोर आली. त्यांच्या अनुपस्थितीत रुग्णालयाच्या कामकाजाची जबाबदारी वैद्यकीय अधिकारी डॉ. गुट्टे, डॉ. ढाकणे आणि डॉ. बेग यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे समजते.
मात्र, वैद्यकीय अधीक्षक अनुपस्थित असताना रुग्णालयातील सर्व सुविधा सुरळीत सुरू होत्या का? हिरकणी कक्ष कुलूपबंद का ठेवण्यात आला? जबाबदारी सोपविल्यानंतरही सुविधांकडे दुर्लक्ष होत असेल, तर त्याला जबाबदार कोण? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
हिरकणी कक्षासह पुरुष स्वच्छतागृहही कुलूपबंद!
आष्टी ग्रामीण रुग्णालयातील असुविधांचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. स्तनदा मातांसाठीचा हिरकणी कक्ष बंद असतानाच पुरुषांसाठीचे स्वच्छतागृहही कुलूप लावून बंद ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना मूलभूत सुविधांसाठीही त्रास सहन करावा लागत आहे.
शासनाच्या निधीतून उभारलेल्या सुविधा नागरिकांच्या उपयोगात येत नसतील, तर त्यांचा उपयोग काय? रुग्णालय प्रशासन या समस्यांकडे लक्ष देणार तरी कधी? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.