

Beed: Crackdown on illegal sand transport and cattle smuggling
कडा, पुढारी वृत्तसेवा : आष्टी पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक आणि गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक रोखत दोन स्वतंत्र कारवायांमध्ये तब्बल १४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
३० सप्टेंबर रोजी सकाळी टाकळसिंग ते हिंगणी रोडवरील नदीच्या पुलाजवळ विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याची माहिती प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांना मिळाली.
त्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी सकाळी ७.४५ वाजता छापा टाकला. यावेळी वाळूने भरलेला महिंद्रा अल्ट्रा वन अर्जुन ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉली असा ७ लाख रुपयांचा वाहन साठा, तसेच त्यामध्ये सुमारे एक ब्रास वाळू किंमत १० हजार रुपये, असा एकूण ७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी कानीफनाथ पांडुरंग झांबरे (रा. टाकळसिंग) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीना नदीपात्रात ३० गोवंशीय वासरे आढळली
त्याच दिवशी सायंकाळी खडकत परिसरात पेट्रोलिंग करत असताना सीना नदीपात्रात बाभळीच्या झाडाजवळ महिंद्रा बोलेरो पिकअपमध्ये गोवंशीय जर्शी जातीची वासरे कोंबून ठेवल्याची माहिती मिळाली. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी पंचांसह छापा टाकला. यावेळी अवघ्या १५ ते २० दिवसांच्या ३० वासरांची सुटका करण्यात आली.
प्रत्येक वासराची अंदाजे किंमत दोन हजार रुपये असून त्यांची एकूण किंमत ६० हजार रुपये आहे. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ७ लाख रुपये किंमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप जप्त करण्यात आली. जनावरे गोशाळेत दाखल करण्यात आली आहेत. याप्रकरणी सद्दाम ऊर्फ अजीज पठाण कुरेशी, जलील हारुण कुरेशी आणि मुजाहेद हाजी कुरेशी (सर्व रा. खडकत) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.