

Ashti Ambewadi Accident
कडा : पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोडीला गेलेल्या एका कष्टकरी मजुरावर काळाने अचानक घाला घातल्याची हृदयद्रावक घटना करमाळा बायपासवर घडली.आष्टी तालुक्यातील आंबेवाडी येथील बाळासाहेब नवनाथ नरवडे (वय ३५) यांचा भरधाव वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला.विशेष म्हणजे, त्याच्यासोबत असलेला पाळीव कुत्राही या अपघातात ठार झाला. या घटनेने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
बाळासाहेब नरवडे हे अनगर येथील साखर कारखान्यावर ऊसतोड मजूर म्हणून काम करत होते. सोमवारी (दि.२६) कामानिमित्त ते आपल्या पाळीव कुत्र्यासह दुचाकीवरून आंबेवाडीकडे निघाले होते. दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास करमाळा बायपासवरून जात असताना अचानक त्यांच्या दुचाकीचा तोल गेला आणि ते रस्त्यावर कोसळले.याच क्षणी पाठीमागून आलेल्या एका भरधाव वाहनाने त्यांना चिरडले.अपघात इतका भीषण होता की, बाळासाहेब आणि त्यांचा पाळीव श्वान दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
बाळासाहेब यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील,पत्नी आणि तीन चिमुकल्या मुली असा मोठा परिवार आहे. घरचा एकमेव कमावता हात गेल्याने नरवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोमवारी रात्री उशिरा अत्यंत शोकाकुल वातावरणात आंबेवाडी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भारताचा प्रजासत्ताक दिनाचा आनंद साजरा होत असतानाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून कष्टकऱ्याचा जीव इतका स्वस्त का?" असा संतप्त सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे.