

Parli child abuse case
अंबाजोगाई: परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन परिसरात चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशी द्या अशी मागणी अंबाजोगाईकरांनी केली. यासह विविध मागण्यांसाठी दलित अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने मंगळवारी (दि.९) निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चाची सुरूवात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील नामफलकास अभिवादन करून करण्यात आली. निषेधाच्या घोषणा देत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे उपविभागीय कार्यालयावर मोर्चा धडकला. निवेदन देण्यापूर्वी या ठिकाणी निषेध सभा झाली. या सभेत दलित अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने विविध नेते व कार्यकर्ते यांनी आपले विचार व्यक्त केले.
त्यानंतर उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रविवार, दि.३१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री पंढरपूरहून परळी येथे कामाच्या शोधात आलेले एस.सी.मागासवर्गीय समाजाचे एक कुटूंब परळी रेल्वे स्टेशन परिसरात झोपले असता पाच वर्षांच्या मुलीला निर्जन ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केला आहे. पीडित मुलगी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रूग्णालय, अंबाजोगाई येथे उपचार घेत आहे. परळी रेल्वे स्टेशनवर ३१ ऑगस्ट रोजी रात्री जे रेल्वे पोलीस ड्यूटीवर होते. तसेच परळी संभाजीनगर पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी ड्यूटीवर होते. त्यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे सदरील घटना घडली आहे.
बीड जिल्हामध्ये प्रामुख्याने परळी पोलीस आपल्या कर्तव्यात कसूर करीत असल्यामुळे परळी शहरामध्ये गुन्हेगार लोकांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. परळी पोलिस नको त्या बाबींमध्ये व्यस्त असल्याने रात्री दिलेल्या ड्यूट्या ते सक्षमपणे बजावत नसल्यामुळे गरीब कुटुंबावर अशी बिकट वेळ आली आहे. जे पोलीस रात्री ड्युटीवर असताना मुलींवर अत्याचार झाला. त्या गुन्ह्यात पोलिसांना ही सहआरोपी करा तसेच पीडित कुटुंबाचे तत्काळ पुनर्वसन करून त्यांना शासकिय सेवेत समाविष्ट करा. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, सदर प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी, या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
निवेदन शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रशासनाला देण्यात आले. अंबाजोगाईकरांनी दलित अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीच्या माध्यमातून काढलेल्या निषेध मोर्चात मानवलोक समाजकार्य महाविद्यालयाचे तसेच श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांचे नेते, प्रमुख कार्यकर्ते, पत्रकार, समाजसेवक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, युवती आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.