

Ambajogai Burglary 11 Lakh Theft
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील रविवार पेठ परिसरातील बाराभाई गल्ली येथे चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत एका व्यापाऱ्याच्या घरातून तब्बल ११ लाख ७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
येथील व्यापारी मोहम्मद अलीमुद्दीन कारीमुद्दीन यांचे एपीजे अब्दुल कलाम शादीखान्याच्या शेजारी घर आहे. त्यांचा किराणा मालाचा व्यवसाय असून दि. २८ जानेवारी रोजी सकाळी त्यांनी घराला कुलूप लावून कुटुंबासह पाथरी येथे मुलाच्या घराच्या सुरू असलेल्या बांधकामाचे काम पाहण्यासाठी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरावर पाळत ठेवली.
दि. २९ जानेवारी रोजी मध्यरात्री सुमारे १.२५ वाजता चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटे फोडून त्यांनी सोन्याचे गंठण, नेकलेस, अंगठ्या, बांगड्या व चेन असा सुमारे ८ लाख ७ हजार ५०० रुपयांचा सोन्याचा ऐवज तसेच कपाटात ठेवलेली ४ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांच्या दुकानातील कामगाराने घर उघडे असल्याची माहिती फोनवरून दिल्यानंतर मोहम्मद अलीमुद्दीन घरी परतले असता घरफोडी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
घरमालकाच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४), ३०५ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद बाबुराव जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शंकर शिंदे करत आहेत.