

केज, पुढारी वृत्तसेवा यूसुफवडगाव पोलिस स्टेशन हद्दीत २१ सप्टेंबरच्या रात्री दोन भीषण अपघात घडले. एका अपघातात ट्रक पलटी होऊन ड्रायव्हर कॅबिनमध्ये अडकला होता. पोलिसांनी जीव धोक्यात घालून त्याला वाचवले. तर दुसऱ्या अपघातात दोन मोटारसायकलमध्ये समोरासमोर धडक होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले.
माळेगावकडून युसुफवडगाव मार्गे अंबाजोगाईकडे ऑईल पेंटचे डब्बे घेऊन जाणारा ट्रक (क्र. डब्ल्यूबी-२३/सी-७९१८) सुकळी येथे वळणावर रस्त्यात्त खोदलेल्या पाइपलाइनच्या खड्यात आदळून पलटी झाला. ट्रकच्या केबिनचा चकनाचूर होऊन ड्रायव्हर सिकंदर (रा. पश्चिम बंगाल) गंभीर जखमी अवस्थेत आत अडकला. सर्वत्र सांडलेल्या ऑईल पेंटमुळे जागा निसरडी झाली होती. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मांजरे, बर्डे, हवालदार संपत शेंडगे, नाईक हनुमंत गायकवाड यांनी काट्यांचा व अंधाराचा सामना करत दोन तासांच्या प्रयत्नानंतर ड्रायव्हरला बाहेर काढले. स्थानिक तरुणांना मदत केली.
दुसऱ्या अपघातात कळंब-माळेगाव रस्त्यावर मांगवडगावजवळ देवीची ज्योत आणण्यासाठी तुळजापूरकडे जात असलेल्या दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. यात गोबिंद शेषेराव नवले (रा. कोठी, ता. केज) यांचा जागीच मृत्यू झाला. तुकाराम फुलचंद भांडवलकर (रा. सोनीजवळा, ता. केज), भोसले (रा. शिंगणवाडी) आणि आणखी एकजण गंभीर जखमी झाले. ट्रक अपघाताचे कारण रस्त्यावर खोदलेला पाईपलाईनचा खड्डा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या बेकायदेशीर खोदकामाकडे बांधकाम प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने कारवाई ची मागणी होत आहे.
जखमी ड्रायव्हर दीड तास रस्त्यावर तडफडत असताना रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. अपघाताची माहिती मिळताच तहसीलदार राकेश गिड्ढे व केज पोलिस ठाण्याचे निरीक्षक स्वप्निल उनवणे यांनी तत्काळ मदतकार्य केले.