

Manjara dam water release
गौतम बचुटे
केज : बीड जिल्ह्यातील मांजरा प्रकल्पाचे बारा दरवाजे आज (दि.२३) सकाळी ९.३० वाजता उघडले आहेत. मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात दि. २२ आणि २३ सप्टेंबर रोजी रात्री पडलेल्या आणि पडत असलेल्या पावसामुळे मांजरा धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज सकाळी ७:३० वा. गेट क्रमांक १, २, ३, ४, ५ आणि ६ हे सहा दरवाजे ३ मीटरने उघडले होते. त्यानंतर गेट क्र. ८, ११, १२, १३, १४ आणि १७ हे सहा दरवाजे ०.२५ मीटरने उघडले आहेत. बारा दरवाजामधून ५५११३.३० क्युसेक (१५६०.८४ क्युमेक्स) इतका विसर्ग सुरू आहे.
धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकानुसार विसर्गाचे प्रमाण वाढवणे अथवा कमी करणे याचा निर्णय घेतला जाईल, असे प्रकल्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच नदीकाठावरील गावांमधील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन धरण प्रकल्प धनेगाव पुरनियंत्रण कक्ष व प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गेल्या आठ–दहा दिवसांपासून बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांनी बँकांमधून तसेच खासगी सावकारांकडून कर्ज काढून पेरणी व लागवड केली होती. या पिकांच्या उत्पन्नावर मुलांचे शिक्षण, विवाह तसेच घरखर्चाची जबाबदारी ते पार पाडत होते. मात्र निसर्गाच्या कोपामुळे ही सर्व पिके वाहून गेली असून शेतकरी हतबल झाले आहेत. आत्महत्येसारखी वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत योगेश (काका) जाधव यांनी राज्य व केंद्र सरकारला मागणी केली आहे की, शेतकऱ्यांना सरसकट एकरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई तसेच कर्जमाफी जाहीर करावी, ज्यामुळे शेतकऱ्यांना या संकटातून दिलासा मिळेल.