Beed Accident | चालकाचे नियंत्रण सुटल्याने ६०० फूट खोल दरीत ट्रक कोसळून आगीत जळून खाक; चालकाचा होरपळून मृत्यू

श्रेग्रेरी घाटात भीषण अपघात, ऊस भरण्यासाठी चालला होता ट्रक, आगीची ज्वाळांनी डोंगरालाही घेरले
Beed Accident | चालकाचे नियंत्रण सुटल्याने ६०० फूट खोल दरीत ट्रक कोसळून आगीत जळून खाक; चालकाचा होरपळून मृत्यू
Beed Accident | चालकाचे नियंत्रण सुटल्याने ६०० फूट खोल दरीत ट्रक कोसळून आगीत जळून खाक; चालकाचा होरपळून मृत्यू
Published on: 
Updated on: 

कडा : आष्टी शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रेग्रेरी घाटात काळाने एका तरुण चालकावर घाला घातला. ऊस वाहतूक करणारा ट्रक तब्बल ५०० ते ६०० फूट खोल दरीत कोसळून पेटल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि.३ नोव्हेंबर) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात २३ वर्षीय चालक सागर सोमनाथ इंदलकर (रा.ब्रह्मगाव) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आगीच्या प्रचंड ज्वाळांमध्ये संपूर्ण ट्रक जळून खाक झाला, तर आगीची धग डोंगरावरील झाडाझुडपांपर्यंत पोहोचल्याने डोंगरालाही आग लागली.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रह्मगाव येथील सागर इंदलकर हे ऊसाचा ट्रक घेऊन मुगगाव येथे ऊस भरण्यासाठी जात होते. सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचा ट्रक श्रेगृरी घाटाच्या माथ्यावर आला असता अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले.त्यामुळे ट्रक मागील बाजूने खोल दरीत कोसळला. तब्बल ५०० ते ६०० फूट खोल दरीत कोसळताच ट्रकने पेट घेतला.काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

️आगीच्या ज्वाळांनी डोंगरालाही घेरले...

अपघातानंतर ट्रकला लागलेल्या आगीने परिसरात भीषण परिस्थिती निर्माण झाली. आगीच्या ज्वाळा डोंगरावरील झाडा झुडपांपर्यंत पोहोचल्याने संपूर्ण परिसरात आग पसरली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त ट्रकजवळ चालकाचा मोबाईल आढळून आला; मात्र आगीची तीव्रता प्रचंड असल्याने चालकाचा शोध घेण्यात अडचणी निर्माण झाल्या. या दुर्घटनेत चालकाचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

️अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव

डोंगराला आग लागल्याची माहिती मिळताच आष्टी नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. एका बाजूला खोल दरीत कोसळलेला जळालेला ट्रक, दुसरीकडे डोंगरावर पसरलेली आग आणि त्यात तरुण चालकाचा झालेला दुर्दैवी अंत,या घटनेने श्रेगृरी घाट परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.